देवळा तालुक्यात कोरोना बाधितांची शंभरी पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 10:23 PM2021-03-16T22:23:26+5:302021-03-17T00:45:35+5:30
देवळा : तालुक्यात तीन दिवसात शंभर कोरोना रुग्ण आढळून आले असून रुग्ण वाढीचा हा वेग प्रशासनाला चिंतेत टाकणारा असला तरी नागरिक मात्र अद्यापही बेफिकिर असल्याचे चित्र आहे.
देवळा : तालुक्यात तीन दिवसात शंभर कोरोना रुग्ण आढळून आले असून रुग्ण वाढीचा हा वेग प्रशासनाला चिंतेत टाकणारा असला तरी नागरिक मात्र अद्यापही बेफिकिर असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील भऊर, मेशी, लोहोणेर, दहिवड, देवळा, कनकापूर आदी गावात मार्च महिन्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. देवळा शहरात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देवळा नगरपंचायत प्रशासनाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशान्वये देवळा शहरात निर्बंध लागू केले आहेत.
यापुढे शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ७ या कालावधीतच सुरु राहणार असून शनिवार व रविवारी दुकाने बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तु, भाजीपाला, दुध, व वृत्तपत्रे वितरण या बाबींना हे नियम लागू राहणार नाहीत. लग्न समारंभ व इतर समारंभासाठी नगरपंचायत व पोलीस प्रशासन यांची परवानगी घेणे अनिवार्य राहील. दि.१५ पासून लॉन्स ,मंगल कार्यालय, हॉल व अन्य तत्सम ठिकाणी लग्न समारंभ तसेच इतर कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत पू र्णपणे बंद राहतील.
खाद्यगृहे , परमिट रुम/बार ५० टक्के टेबल क्षमतेने सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच धार्मिक स्थळे शनिवार व रविवार या दिवशी बंद राहतील आदी निर्बंध घालण्यात आले आहेत.
देवळा शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे शनिवारी व रविवारी सर्व दुकाने बंद होती. सोमवारी नेहमीप्रमाणे दुकाने उघडण्यात आली, परंतु सायंकाळी ७ वाजता एकही दुकान बंद झाले नाही. अखेर पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर दुकाने तातडीने बंद झाली.
अत्यावश्यक सेवा मात्र सुरू होत्या. यानंतर सर्व रस्ते सुनसान झाले. रात्री पाच कंदील चौकात येणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी झाली.
नागरिकांनी आता कोरोना विषाणूचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन तहसिलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी केले आहे.