शेकडो दिंड्या त्र्यंबकनगरीत विसावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 05:04 PM2019-01-30T17:04:55+5:302019-01-30T17:05:15+5:30
निवृत्तीनाथ यात्रा : भगव्या पताकांनी शहर सजले
त्र्यंबकेश्वर :
सकळही तिर्थे निवृत्तीचे पायी।
तेथे बुडी देई माझ्या मना॥
मुखी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा नामजप करत टाळ-मृदंगाच्या गजरात त्र्यंबकेश्वर शहरात शेकडो दिंड्या दाखल होत असून यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला आहे. दिंड्या-भगव्या पताकांनी त्र्यंबकनगरी सजली आहे. एकादशीला (दि.३१) पहाटे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाल्यानंतर भाविकांच्या गर्दीला उधाण येणार आहे.
संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या निमित्ताने महिनाभरापासून जीवघेणी थंडी, दिवसा उन अशा परिस्थितीत संजीवन समाधी स्थळाचे दर्शन घेण्याच्या ओढीने पायी दिंडी सोहळ्यात दाखल होऊन यंबकेश्वरची वाट तुडवत येणा-या वारकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपली आहे. शेकडो दिंड्या त्र्यंबकेश्वरी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे कुशावर्त परिसरात भाविकांच्या गर्दीला उधाण आले आहे. त्र्यंबक नगरपरिषद व श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने हार फुले तर गजानन महाराज संस्थान तर्फे उपरणे देऊन दिंड्यांचे स्वागत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे दिंडी कुठुन आली, दिंडीत किती वारकरी आहेत, महिला पुरु ष याबाबतची माहिती संकलित केली जात आहे. साधारण तळेगाव पासुन ते या चारही दिशेला असलेल्या अंबोली, पहिने या गावांमधील नेहमीच्या फडावर दशमीच्या कीर्तनाचा गावकरी लाभ घेत आहेत. आळंदी,सासवड ,मुक्ताईनगर, बेलापुर आदी मानाच्या दिंडया देखील आपल्या फडावर स्थिरावल्या आहेत. दशमी, एकादशी आणि द्वादशी अशी तीन दिवस यात्रा भरते. दरम्यान त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांच्या गर्दीने फुलली असुन सर्व प्रकारचे दुकाने, स्टॉल्स लागले आहेत.गावाबाहेरील पटांगणात तमाशांचेही फड उभे राहिले आहेत. परिसरातील खेड्यांमधील आदिवासी बांधवांना देखील सुगीचे दिवस आले असून त्र्यंबकेश्वर यात्रेमध्ये कोट्यावधी रु पयांची उलाढाल होत आहे.
शासकीय महापूजा
संत निवृत्तीनाथांच्या शासकीय महापुजेसाठी दरवर्षी मंत्री महोदयांना निमंत्रित करण्याची परंपरा आहे. यावर्षी देखील जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते निवृत्तीनाथ महाराज यांची शासकीय महापुजा पहाटे होणार आहे.