दीडशे कर्मचाऱ्यांवर आज होणार फौजदारी
By admin | Published: February 10, 2017 12:20 AM2017-02-10T00:20:40+5:302017-02-10T00:20:51+5:30
प्रशिक्षणाला दांडी : निवडणूक अधिकारी करणार कारवाई
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी तीनशे कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला दांडी मारली होती. त्यापैकी १५७ कर्मचाऱ्यांवर फौजदारी करण्यात येणार असून, शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस ठाण्यात या कर्मचाऱ्यांच्या नावाने रीतसर तक्रारी दाखल करणार आहेत.
महापालिका आणि जिल्हा परिषद - पंचायत समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यामुळेच निवडणूक हाताळण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठीच सुमारे सात हजार सातशे कर्मचारी लागणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेने नियोजन करून शाळा महाविद्यालय आणि अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे दिली होती, परंतु महापालिकेने
गेल्या रविवारी (दि.५) कालिदास कलामंदिर, राजे संभाजी स्टेडियमसह विविध ठिकाणी आयोजित केलेल्या प्रशिक्षणाला सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांनी दांडी मारली
होती.
महापालिकेने त्याची दखल घेत या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. त्याचा १४३ कर्मचाऱ्यांनी खुलासा दिला असून, आणखी १५७ कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा खुलासा विहित मुदतीत केला नाही. त्यापार्श्वभूमीवर आता या गैरहजर कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या सूत्रांनी दिली. शुक्रवारी विविध पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.