शेकडो इच्छुकांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द !
By admin | Published: February 4, 2017 01:32 AM2017-02-04T01:32:27+5:302017-02-04T01:32:41+5:30
सर्वपक्षीयांची क्लृप्ती : नाराजांची अखेर बोळवण
नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात वाढलेल्या इच्छुकांच्या नाराजीला आवर घालण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वतीने अनेक प्रयत्न करण्यात आले. महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदापासून अन्य अनेक पदांचे आमिष देण्यात आले. तथापि, नाराजी कमी झाली नाही उलट महापालिका निवडणुकीत त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये चुरस असली तरी शिवसेना आणि भाजपाकडे इच्छुकांची अधिक संख्या होती. भाजपाकडे सातशेहून अधिक, तर शिवसेनेकडे आठशेहून अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यानुसार उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. तथापि, सर्वच पक्षांकडे इच्छुकांची दावेदारी इतकी प्रबळ होती की, प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने नेत्यांच्या, समाजाच्या माध्यमातून दबाव आणत होते.
अखेरीस अशा नाराजांना स्वीकृतचा शब्द देण्यात आला आहे. नेत्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवणे कठीण असले तरी केवळ नेत्यांचा शब्द म्हणून अनेकांनी दावेदारी मागे घेतली आणि पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून देण्याची तयारी दर्शविली. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाच्या वतीने अशाप्रकारे वेगवेगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्यपदाचा शब्द दिला आहे. शिवसेनेतही अशाच प्रकारे अनेकांना राजी करण्यासाठी स्वीकृत सदस्यपदासह वेगवेगळे शब्द दिले जात आहे.