राज्यात सव्वा लाख शिक्षकांच्या जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 11:59 PM2019-07-28T23:59:22+5:302019-07-28T23:59:53+5:30
राज्यात दरवर्षी दोन ते तीन टक्के याप्रमाणे १५ ते १६ हजार शिक्षक निवृत्त होत असून, २०१२ पासून आतापर्यंत राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या सव्वा लाखावर पोहोचली असून, शासनाच्या शिक्षकभरती पोर्टलवर मात्र केवळ १२ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे दाखविले जात आहे.
नाशिक : राज्यात दरवर्षी दोन ते तीन टक्के याप्रमाणे १५ ते १६ हजार शिक्षक निवृत्त होत असून, २०१२ पासून आतापर्यंत राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या सव्वा लाखावर पोहोचली असून, शासनाच्या शिक्षकभरती पोर्टलवर मात्र केवळ १२ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे दाखविले जात आहे. रिक्त जागांची संख्या मिळविणे ही यंत्रणाच सदोष असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष तथा अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे रविवारी (दि.२८) मु. शं. औरंगाबादकर सभागृहात शिक्षण तपस्वी पुरस्कारांचे वितरण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार किशोर दराडे, मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक भाऊसाहेब खातळे, प्राचार्य राम कुलकर्णी, गोपाळ पाटील आदी उपस्थित होते. अभ्यंकर म्हणाले, शिक्षकांमध्ये त्यांच्या वेतनपद्धतीत बदल होत असल्याविषयीचे गैरसमज पसरविणारे संदेश फिरत असून, वास्तविकतेत शासनाकडून अस्तित्वात नसलेल्या कालबाह्य झालेल्या तरतुदी रद्द केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे विनाअनुदानित शिक्षकांची स्थिती अतिशय दयनीय असून, अशा शाळांचा प्रश्न सरकाने सोडविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. यापुढे केवळ स्वयंअर्थसाह्यित शाळांनाच परवानगी मिळणार असून, त्यामुळे केवळ इंग्रजी शाळाच सुरू होऊ शकणार असून, मराठी, हिंदी, उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी कठीण स्थिती असून अशा अनुदानित शाळाच सुरू होणार नाही. पात्र शाळांना अनुदान देण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी वापरावा यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन राजेश भुसारे यांनी केले. मधुकर वाघ यांनी आभार मानले.
बादशाह, वैद्य, निरगुडे यांना जीवनगौरव
नाशिक जिल्हा शिक्षक सेनेतर्फे शिक्षणक्षेत्रात कार्यरत असताना समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर संघटनेचे फिरोज बादशहा, शारदा विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे सुभाषचंद्र वैद्य, पगारदारांच्या सहकारी पतसंस्थेचे शिवाजी निरगुडे यांना जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
शिक्षणतपस्वी पुरस्कारार्थी
जिल्हास्तरावर मच्छिंद्र कदम, रावसाहेब जाधव, दिनेश अहिरे, मीनाक्षी गायधनी, भरत पवार, सोपान वाटपाडे, अरुण पाटील, भागवत आरोटे, अरुण जायभावे, डॉ. विठ्ठलसिंग ठाकरे, नईम शाहिन, राजेंद्र भुसारे, नितीन गायकवाड, भाऊसाहेब कापडणीस, दिलीप अहिरे, अशोक बागुल, सी. एम. फुलपगार, माधुरी कुलथे, अजिज सय्यद, राजेंद्र बनसोडे, सोमनाथ धात्रक यांना शिक्षणतपस्वी पुरस्काराने गौरविण्यात आले. इतर विभागस्तरावर देवीदास बुधवंत, भाऊसाहेब भोगाडे, आप्पासाहेब शिंदे, राजेश जाधव, सुरेश पाटील, राजेंद्र वाघ, उमाकांत गुरव, अजय अमृतकर, भाऊराव पाटील, अनिल साळुंके यांचा शिक्षणतपस्वी पुरस्काराने सन्मान करण्यात आला.