हरित भविष्यासाठी नाशिक देवराईमध्ये एकत्र आले शेकडो हात
By अझहर शेख | Published: June 5, 2023 07:51 PM2023-06-05T19:51:27+5:302023-06-05T19:51:56+5:30
काही तासांत १६०० रोपांची लागवड
अझहर शेख, नाशिक: सातपूरजवळील पश्चिम वनविभागाच्या वनजमिनीवर उदयास आलेल्या ‘नाशिक देवराई’मध्ये शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, खासगी संस्था, वैद्यकीय संस्थांच्या लोकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षलागवड केली. आपलं पर्यावरण संस्थेकडून यावर्षी या वनात ४५ प्रजातीच्या आंब्यांच्या सुमारे दीड हजार रोपांची लागवड करण्याचा उपक्रम सोमवारी (दि. ५) घेण्यात आला. यावेळी आबालवृद्धांचे शेकडो हात हरित भविष्यासाठी एकत्र आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोमवारी सकाळपासूनच विविध शाळा, महाविद्यालयांसह खासगी संस्थांच्या लोकांनी देवराई गाठण्यास सुरुवात केली. वृक्षारोपणासाठी आलेल्या नागरिकांपैकी बहुसंख्य लोकांनी सोबत झाडांना टाकण्यासाठी पाणीदेखील आणले होते. देवराईमध्ये आमराई साकारण्याचा आपलं पर्यावरण संस्थेने संकल्प सोडला आहे.
पहिल्या टप्प्यात शेंदऱ्या, कुईरी, कवट्या, गोटी, लोणचा, शेप्या, ब्रह्मपुरी यांसारख्या बारा आंब्याच्या प्रजातींची १६० झाडे लावण्यात आली. याव्यतिरिक्त वरस, पायर, गोंदण, भिरा, कुसुम, करपा, मोई, जंगली अजान, खटखटी, पाडळ, कुंकू, खडकपायर, तुतु, निमई यासारख्या देशी प्रजातीच्या रोपांचीही आलेल्या लोकांनी लागवड केली. दिवसभरात याठिकाणी एकूण १ हजार ६६० रोपांची लागवड पूर्ण करण्यात आल्याची माहिती संस्थेचे शेखर गायकवाड यांनी दिली. संस्थेच्या स्वयंसेवकांकडून या वनात खड्डे खोदून त्यात पाण्याचा ओलावा देत खत टाकून खड्डे वृक्षारोपणासाठी सज्ज ठेवण्यात आले होते. वृक्षप्रेमी आबालवृद्धांना रोपे पुरवून लोकसहभागातून लागवड करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक दिनकर पाटील, तानाजी जायभावे, वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.