ग्रामीण भाग शंभरीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 09:54 PM2020-05-18T21:54:48+5:302020-05-19T00:30:59+5:30

नाशिक : जिल्ह्यात मालेगाव शहर आणि परिसरात कोरोनाने थैमान घातले असतानाच उर्वरित ग्रामीण भागात बाधितांची संख्या शंभराच्या पुढे जाऊन पोहोचली आहे. नाशिकजिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत १०३ कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यात येवला तालुक्यातील बाधितांची संख्या सर्वाधिक ३३ इतकी आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणा दिलासा लाभला आहे.

Hundreds of rural areas | ग्रामीण भाग शंभरीपार

ग्रामीण भाग शंभरीपार

Next

नाशिक : जिल्ह्यात मालेगाव शहर आणि परिसरात कोरोनाने थैमान घातले असतानाच उर्वरित ग्रामीण भागात बाधितांची संख्या शंभराच्या पुढे जाऊन पोहोचली आहे. नाशिकजिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत १०३ कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यात येवला तालुक्यातील बाधितांची संख्या सर्वाधिक ३३ इतकी आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणा दिलासा लाभला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्चला पहिल्यांदा लॉकडाउन घोषित केल्यानंतर नाशिक जिल्ह्यात २९ एप्रिल रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण हा नाशिक ग्रामीणमध्येच आढळून आला होता. निफाड तालुक्यातील हा रुग्ण नंतर कोरोनामुक्त होणाराही पहिलाच रुग्ण ठरला होता. त्यापाठोपाठ नाशिक शहरात एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, ८ एप्रिल रोजी मालेगावमध्ये एकाचवेळी ५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा हादरली. तेव्हापासून मालेगावचा बाधित रुग्णांचा आकडा वाढत जाऊन त्याने सहाशेचा टप्पा पार केलेला आहे. मालेगाव महापालिका हद्दीत आतापर्यंत ६१९ बाधित आढळून आले आहेत, तर मालेगाव ग्रामीण भागात १६ रुग्ण बाधित आहेत. नाशिक महापालिका हद्दीत आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ४७ वर जाऊन पोहोचली आहे.
मालेगावमधील वाढत्या बाधितांच्या संख्येने प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झालेली असतानाच जिल्ह्याच्या उर्वरित ग्रामीण भागातही मालेगाव-मुंबई कनेक्शनमुळे बाधितांच्या संख्येत भर पडत गेली. जिल्ह्यात मालेगाव आणि नाशिक मनपापाठोपाठ येवला तालुक्यात ३३ रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे. निफाड, सिन्नर आणि दिंडोरी तालुक्यालाही कोरोनाचा झटका बसल्याने येथील स्थानिक यंत्रणाही अधिक सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतावर बाधितांची संख्या १०३ वर जाऊन पोहोचली आहे. त्यात कोरोनामुक्त होण्याचेही प्रमाण दिलासाजनक असून, बाधितांच्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्तींचेही चाचणी अहवाल निगेटिव्ह येत असल्याने नागरिक सुटकेचा नि:श्वास सोडत
आहेत.
दरम्यान, आता ३१ मेपर्यंत लॉकडाउनला मुदतवाढ मिळाल्याने जिल्ह्यात अटी-शर्तींवर काही व्यवहार सुरू करण्यास परवानगी मिळाली असली तरी ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका स्तरावर जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात येऊन सतर्कता बाळगली जात आहे. त्याला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
-------------------------------------------
पाच तालुके कोरोनापासून दूर
जिल्ह्यातील १५ पैकी १० तालुक्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केलेला आहे. मात्र, पाच तालुक्यांनी कोरोनाला दूर ठेवण्यात आतापर्यंत यश मिळविलेले आहे. जिल्ह्यात देवळा, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ आणि इगतपुरी या तालुक्यांत आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. तरीही या तालुक्यात प्रशासनाने आरोग्य यंत्रणा तैनात ठेवली असून, तालुक्यातील गावकऱ्यांकडून आपापल्या स्तरावर विशेष दक्षता घेतली जात आहे. विशेष म्हणजे हे तालुके आदिवासी क्षेत्रात मोडतात. त्यामुळे आदिवासी बांधवांनी कोरोनाला आपल्यापासून दूर राखण्यात यश मिळविल्याचे दिसते. प्रामुख्याने, याला आदिवासी बांधवांची प्रतिकारशक्ती वाढविणारी जीवनशैली कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.
------------------------------
तालुकानिहाय बाधित
नाशिक - ९
चांदवड - ४
सिन्नर - ८
दिंडोरी - ९
निफाड - १५
नांदगाव - ६
येवला - ३३
कळवण - १
सटाणा - २
मालेगाव ग्रामीण - १६
एकूण - १०३

Web Title: Hundreds of rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक