शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

By admin | Published: October 1, 2016 12:07 AM2016-10-01T00:07:10+5:302016-10-01T00:07:39+5:30

कळवण : वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने राज्यपालांचे लक्ष वेधले

Hundreds of students deprived of education | शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

Next

कळवण : यंदाच्या शैक्षणिक वर्षात निरनिराळ्या शैक्षणिक शाखांना प्रवेश घेतलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांपैकी ९८७ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत, तर वसतिगृहाची सोय झाली नाही म्हणून शेकडो विद्यार्थी कळवण शहरातून व तालुक्यातून माघारी घराकडे परतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रता असूनही शेकडो आदिवासी विद्यार्थी केवळ राहण्याची व्यवस्था नसल्याने शिक्षणापासून वंचित झाले आहेत. वसतिगृहाची सोय करावी अशी मागणी आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींसह जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव, राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, विधिमंडळ अनुसूचित जाती- जमाती समितीचे अध्यक्ष आमदार रुपेश म्हात्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कळवण, मानूर, अभोणा, कनाशी, दळवट, नाकोडे तसेच सुरगाणा, बोरगाव, देवळा, डांगसौंदाणे आदि कळवण प्रकल्पांतर्गत येत असलेल्या निरनिराळ्या शासकीय अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालयांमध्ये तसेच इतर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात निरनिराळ्या शैक्षणिक शाखांना प्रवेश घेतलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांपैकी ९८७ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. वसतिगृहासाठी ३२८० विद्यार्थिसंख्या मंजूर असून, ३३१५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. ९८७ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज प्रलंबित असून, १२५० वाढीव प्रवेशाची मागणी शासनस्तरावर करण्यात आली असल्याची माहिती प्रकल्प कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. ९८७ विद्यार्थ्यांचे वसतिगृह प्रवेश अर्ज शासनस्तरावर खास बाब म्हणून मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत, तर वसतिगृहाची सोय झाली नाही म्हणून अनेक विद्यार्थी घराकडे परतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पात्रता असूनही हे विद्यार्थी केवळ राहण्याची व्यवस्था नसल्याने शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. या प्रवेशासंबंधी गेल्या ३ ते ४ वर्षांपासून कळवण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात आंदोलन, मोर्चा तसेच टाळेबंदी आंदोलने झाली. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. राज्यपालांना यासंदर्भात निवेदन देण्यात येऊन लक्ष वेधून घेतल्यानंतर शासनस्तरावरून व मंत्रालयातून खास बाब म्हणून आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्यासाठी जयश्री पवार यांना मागील काळात यश आले होते. (वार्ताहर)

कळवण तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याची मागणी
आदिवासी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळावा म्हणून कळवण प्रकल्पांतर्गत असलेल्या सात तालुक्यांतील आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक नाशिक, कळवण येथील अधिकाऱ्यांच्या दारात जाऊन प्रवेशाची याचना करीत आहेत. कळवण तालुक्यातील शासकीय वसतिगृहांचा उपयोग तालुक्यातील विद्यार्थ्यांना होणार नसेल तर त्यांचा काय उपयोग? माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय सुरू होऊन चार महिने झाले असून, काही पाठ्यक्र माच्या विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची परीक्षेची तारीखदेखील जाहीर झाली आहे. कळवण तालुक्यातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देताना प्राधान्य दिले जावे, अशी मागणी विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक करीत असताना प्रकल्प कार्यालयातील जबाबदार अधिकारी ‘आम्ही तुम्हाला कुठलीही मदत करू शकत नाही, तुम्हाला पटेल ते करा’ अशी बेजबाबदार वक्तव्ये करीत मंत्रालयातून आदेश येईल तेव्हा प्रवेश मिळेल, अशी उत्तरे आदिवासी पालकांना दिली जात आहेत.

मागील चार महिन्यांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेशासंबंधीचा घोळ सुरूच असून, कळवण तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना दररोज पदरखर्च करून शिक्षण घ्यावे लागत असून, शासनाच्या आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींना असलेल्या सवलतीचा फायदा होत नसल्याने आदिवासी बांधवांमध्ये नाराजीचा सूर आहे.
- डी. एम. गायकवाड, अध्यक्ष, आदिवासी संघर्ष समिती, कळवण

Web Title: Hundreds of students deprived of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.