टोकडे ग्रामस्थांचे चक्री उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 10:29 PM2020-01-16T22:29:39+5:302020-01-17T01:18:47+5:30
टोकडे ग्रामपंचायतीत ग्रामसेवक व सदस्यांनी विकासकामांमध्ये संगनमताने गैरव्यवहार केल्याचे तसेच कागदोपत्री कामे दाखवून बिले अदा करण्यात आली असल्याचा आरोप करीत गैर व्यवहारातील रक्कम वसुल करावी, दोषींवर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी टोकडे ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू केले आहे. गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
मालेगाव : तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतीत ग्रामसेवक व सदस्यांनी विकासकामांमध्ये संगनमताने गैरव्यवहार केल्याचे तसेच कागदोपत्री कामे दाखवून बिले अदा करण्यात आली असल्याचा आरोप करीत गैर व्यवहारातील रक्कम वसुल करावी, दोषींवर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी टोकडे ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू केले आहे. गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
टोकडे गावात २०१४-१५ पासून आजपर्यंत चौदावा वित्त आयोग, आमदार, खासदार निधीतून झालेली विकासकामे अंदाजपत्रकानुसार करण्यात आलेली नाही. निकृष्ट कामे करीत लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र याची चौकशी झाली नाही. टोकडे गावातील स्मशानभूमी, क्रीडांगण, शहीद भगतसिंग सभा मंडप, संगणक कक्ष, गाळ्यांचे काम, जि. प. शाळेचे कम्पाउंड, शौचालय बांधकाम, अंगणवाडी चौक सुशोभीकरण, घरकुल वाटप, जलवाहिनीचे काम गावांतर्गत रस्ते, विहीर पुनर्भरण आदी विकासकामांमध्ये गैरव्यवहार झाला आहे. या कामांची चौकशी करावी या मागणीसाठी गेल्या मंगळवारपासून बेमुदत चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे. न्याय मिळेपर्यंत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपोषण करण्यात येत आहे.
गुरुवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता. या आंदोलनात विठोबा द्यानद्यान, वसंत शेजवळ, प्रकाश शेजवळ, नवलसिंग शिरसाठ, हिरामण शेजवळ, दीपक डिंगर, सोपान सुमराव, नितीन सुमराव, सोपान द्यानद्यान, अनिल फरस, हेमंत फरस, जवाहरसिंग संगेडा, मनोज दराखा, मनोद द्यानद्यान, नितीन डिंगर, विजय डिंगर आदी सहभागी झाले होते.