नैवेद्याने भागविली गोरगरिबांची भूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:30 AM2019-03-28T00:30:43+5:302019-03-28T00:31:02+5:30
‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या श्लोकानुसार होळीपासून शीळ सप्तमीपर्यंत श्री शितळादेवीला नैवेद्य दाखविण्यात येणाऱ्या नैवेद्याची नासाडी होऊ नये म्हणून सुशील व उज्ज्वल मुक्ती बहुराणी मंडळाच्या महिलांनी पहाटेपासून दुपारपर्यंत सर्व नैवेद्य गोळा करून गोरगरिबांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी अन्न असलेल्या नैवेद्याचे वाटप केले.
नाशिकरोड : ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या श्लोकानुसार होळीपासून शीळ सप्तमीपर्यंत श्री शितळादेवीला नैवेद्य दाखविण्यात येणाऱ्या नैवेद्याची नासाडी होऊ नये म्हणून सुशील व उज्ज्वल मुक्ती बहुराणी मंडळाच्या महिलांनी पहाटेपासून दुपारपर्यंत सर्व नैवेद्य गोळा करून गोरगरिबांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी अन्न असलेल्या नैवेद्याचे वाटप केले.
राजस्थानी, मारवाडी आदी समाजात होळीच्या दुसऱ्या दिवसापासून शीळ सप्तमीनिमित्त देवी मंदिरातील श्री शितळादेवी मंदिरात पूजा-अर्चा करून नैवेद्य दाखविला जातो. मंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन काही महिला भाविक शीळ सप्तमीच्या अगोदरच नैवेद्य दाखवितात.
नाशिकरोडची ग्रामदेवता असलेल्या श्री दुर्गादेवी मंदिरातील श्री शीतलादेवी मंदिरात नैवेद्य चढवितात. देवाला चढविलेले नैवेद्य हे अन्नच असून ते वाया जाऊ नये, नासाडी होऊ नये याबाबत उपाध्याय प्रवर प्रवीणऋषीजी म.सा. यांनी प्रवचनात तो नैवेद्य गोरगरिबांच्या पोटाची भूक भागवू शकतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले होते.
याकरिता बहुराणी मंडळाच्या महिलांनी नैवेद्य जमा करून दररोज जमा होणारे नैवेद्य दुर्गा उद्यानाबाहेरील भिकारी, तक्षशीला विद्यालय, जयभवानीरोड येथील अनाथाश्रम आदी ठिकाणच्या गरजू, गोरगरिबांना तो नैवेद्य वाटून त्यांच्या पोटाची भूक भागवित होते. दोन्ही बहुराणी मंडळांकडून गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
बहुराणी मंडळाच्या महिलांनी पुढाकार घेत नैवेद्य अन्नच आहे हे लक्षात घेऊन गेल्या सात दिवसांपासून गोरगरिबांची अन्नाची भूक भागविली आहे. याकरिता स्नेहल तोडरवाल, वर्षा चोरडिया, रक्षा शहा, हर्षा दुधेडिया, सोनल संकलेचा, स्नेहल खिवंसरा, प्रियंका भंडारी, तृप्ती ललवाणी, सारिका नहाटा, तृप्ती बोरा, वैशाली संचेती, प्रिया धाडीवाल, मानसी धाडीवाल, सायली कटारिया आदी बहुराणी मंडळाच्या महिलांनी सहकार्य केले आहे.
अंधश्रद्धेला दूर सारून...
देवी-देवतांना केलेला नैवेद्य, नवस फेडताना आदी प्रकारे अन्न मोठ्या प्रमाणात वाया जाऊन त्याची नासाडी होते. तर दुसरीकडे गोरगरीब, भिकारी, गरजू अन्नाअभावी भुकेने व्याकूळ होऊन तडफडतात. देवतांचा नैवेद्य असला तरी ते अन्न आहे व नैवेद्य-अन्नाची नासाडी होऊ नये गरजूंच्या पोटाचा आधार व्हावा याबाबत प.पू. प्रवीणऋषीजी म.सा. यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर ‘बहुराणी’ यांनी पुढाकार घेत अंधश्रद्धेला दूर सारून नैवेद्य असलेल्या अन्नाचे गरजूंना वाटप केले.
अन्नाची नासाडी टळली
प्रवीणऋषीजी म.सा. यांनी केलेले मार्गदर्शन व दाखविलेला रस्ता लक्षात घेऊन सुशील बहुराणी मंडळ व उज्ज्वल मुक्ती बहुराणी मंडळाच्या महिलांनी पुढाकार घेत गेल्या सात दिवसांपासून दररोज पहाटे ५ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत श्री दुर्गादेवी मंदिरात श्री शितला देवी मंदिरात पूजा करून नैवेद्य दाखविण्यास आलेल्या महिलांकडून नैवेद्य दाखविल्यानंतर संपूर्ण नैवेद्य गोळा करून घेत होते. याकरिता बहुराणी मंडळाच्या महिलांनी नैवेद्य दाखविण्यास आलेल्या महिला भाविकांची नैवेद्याची होणारी नासाडी याबाबत प्रबोधन करून पहाटेपासून दुपारपर्यंत नैवेद्य जमा करीत होते.