चांदवडला शेतकऱ्याचे बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:58 AM2019-05-08T00:58:11+5:302019-05-08T00:58:47+5:30
चांदवड : महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या संरक्षित शेती योजने अंतर्गत शेडनेट उभारणी करताना पुरवठादाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविल्याचा आरोप करीत नारायणगाव येथील संदीप व राजेंद्र बाळासाहेब मांदळे या शेतकऱ्यांनी सोमवारपासून येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
चांदवड : महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या संरक्षित शेती योजने अंतर्गत शेडनेट उभारणी करताना पुरवठादाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविल्याचा आरोप करीत नारायणगाव येथील संदीप व राजेंद्र बाळासाहेब मांदळे या शेतकऱ्यांनी सोमवारपासून येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
मांदळे यांनी शेतीपिकाचे सुमारे १३ लाख रु पयांचे नुकसान झाल्याचा आरोप करत अपूर्णावस्थेतील कामाचा, पुरवलेल्या साहित्याचा व नुकसान झालेल्या शिमला मिरची पिकाचा वस्तुनिष्ठ पंचनामा व अहवाल मिळावा अशी मागणी केली आहे. तालुक्यातील महाराष्ट्र कृषी विभागाच्या संरक्षित शेती योजनेंतर्गत शेडनेट उभारण्यासाठीची ५० टक्के अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत तालुक्यातील नारायणगाव येथील शेतकरी संदीप मांदळे यांचे भाऊ राजेंद्र मांदळे व किरण मांदळे यांनी प्रत्येकी दहा लाख रुपये याप्रमाणे एकूण २० लाख रुपये खर्च करून शेडनेट हाउस प्रकल्पाची उभारणी केली होती.
मात्र शेडनेटची उभारणी करताना पुरवठादाराने शासननिर्णयानुसार साहित्य न पुरवता शेडनेट व शेडनेटचे सर्व साहित्य निकृष्ट प्रतीचे पुरवले तसेच सूक्ष्म सिंचनाचे काम अपूर्ण ठेवल्याने डिसेंबर २०१६ ते एप्रिल २०१७ या कालावधीत दोन्ही शेतकºयांच्या शिमला मिरची
पिकाचे प्रत्येकी साडेसहा लाख असे एकूण सुमारे १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे मांदळे यांनी सांगितले.
याबाबत मांदळे यांनी तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग पंचायत समिती चांदवड, तहसील, प्रांत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तालय आदी संबंधित विभागांशी
पत्रव्यवहार केला होता. मात्र कोणतीही माहिती देण्यात न आल्याने संपूर्ण माहिती मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा मांदळे यांनी दिला आहे. आयुक्तालय व कृषी अधीक्षक यांनी, सदर पुरवलेले साहित्य, अपूर्णावस्थेतील काम व पिकाचे नुकसान याबाबत तपासणीचे आदेश काढूनही त्याबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप मांदळे यांनी केला आहे. मुद्देनिहाय माहिती देण्याबाबत दि. २३ एप्रिल रोजी तालुका कृषी अधिकºयांना निवेदन सादर करून उपोषणाचा इशारा दिला होता.