पोषण आहारासाठी शोधाशोध
By admin | Published: May 9, 2016 11:34 PM2016-05-09T23:34:14+5:302016-05-09T23:52:35+5:30
पाडळी : पाताळेश्वर विद्यालयाची विद्यार्थ्यांसाठी मोहीम
सिन्नर : गावांपेक्षा वाड्या-वस्त्यांवर दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याची बाब लक्षात घेऊन सिन्नर तालुक्यातल्या पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या वतीने मोहीम आखली आहे. त्याअंतर्गत पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या वाड्या-वस्त्यांवरील मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत आणून पोषण आहार दिला जात आहे.
पाताळेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी राधा विठ्ठल गावंडे ही विद्यार्थिनी सावरगाव पाट ते टोळेवस्ती हे डोंगर पायथ्याचे तीन किलोमीटर अंतर दररोज कापून पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी पायपीट करत असल्याची बाब शिक्षकांना समजली होती. तहान भागविण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी होणारी ही ससेहोलपट दुष्काळाची दाहकता व पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणारी ठरली. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सविता देशमुख, टी. के. रेवगडे, कैलास गांगुर्डे, एम. सी. शिंगोटे या शिक्षकांनी वाड्या-वस्त्यांवर जाऊन १ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचा शोध घेत त्यांना शाळेत आणून शालेय पोषण आहार देण्याची मोहीम सुरू केली आहे.
वाड्या-वस्त्यांवरील व आदिवासी मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, बालसंस्कार केंद्र राबवणे, बाल मजुरीचे प्रमाण थांबवणे आदि उपक्रम विद्यालयाच्या वतीने राबविण्यात येत आहे. (वार्ताहर)