स्वच्छता अभियानासाठी चित्रकारांची शोधाशोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:51 AM2018-08-18T00:51:52+5:302018-08-18T00:52:14+5:30
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मिशन उपक्रमासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्वच्छता उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या मोहिमेत ग्रामस्थांचा सहभाग वाढावा यासाठी गावागावात स्वच्छता विषयक चित्रे आणि मजकूर रंगविण्यासाठी चित्रकारांची आवश्यकता असल्याने जिल्ह्यातून चित्रकारांचा शोध घेतला जात आहे. १३६८ ग्रामपंचायतींमधील गावागात चित्रे रंगविण्याचे मोठे आव्हान जिल्हा परिषदेपुढे आहे.
नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मिशन उपक्रमासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्वच्छता उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या मोहिमेत ग्रामस्थांचा सहभाग वाढावा यासाठी गावागावात स्वच्छता विषयक चित्रे आणि मजकूर रंगविण्यासाठी चित्रकारांची आवश्यकता असल्याने जिल्ह्यातून चित्रकारांचा शोध घेतला जात आहे. १३६८ ग्रामपंचायतींमधील गावागात चित्रे रंगविण्याचे मोठे आव्हान जिल्हा परिषदेपुढे आहे. देशभरात स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या मूल्यांकनासाठी केंद्र सरकारकडून स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत गावाची तपासणी १ आॅगस्ट ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत केली जाणार असून अनेक जिल्ह्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. नाशिक जिल्ह्याची तपासणी येत्या दोन ते तीन दिवसांत होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने सर्व बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गावाला तालुकास्तरावरून संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हा स्तरावरील खातेप्रमुखानाही तालुक्यांचे वाटप करण्यात आले आहे. याबाबत दररोज आढावा घेण्यात येत असून, ग्रामस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहे. गावागावांतील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, सर्व प्रार्थनास्थळे, बाजाराची ठिकाणे आणि इतर महत्त्वाची ठिकाणे यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, अशा ठिकाणच्या इमारतींवर स्वच्छतेविषयक जागरूकता निर्माण करणारे घोषवाक्य आणि चित्र रेखाटले जात आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या दैनंदिन जीवनावर आधारित चित्रे आणि भाषा असल्यामुळे अशा प्रकारच्या कलावंतांना शोधून त्यांना काम देण्याचे आव्हान जिल्हा परिषदेपुढे आहे. जिल्ह्यात अनेक गावांमध्ये अशा प्रकारचे चित्र रंगविण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे; मात्र गावांच्या संख्येच्या तुलनेत चित्रकारांची संख्या कमी असल्याने येत्या दोन-तीन दिवसांत केंद्रीय समिती येण्यापूर्वीच ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. ज्यांना कुणाला अशा कलावंतांची माहिती असेल त्यांना त्यांची माहिती ग्रामसेवकांना कळवावी किंवा ग्रामपंचायतीला माहिती द्यावी असे आवाहन केले जात आहेच शिवाय कलावंत एकमेकांना मोहिमेची माहिती देऊन कामे मिळवून देऊ लागली आहेत. अशा कलावंतांनी तर एक व्हॉट््सअॅप ग्रुपच स्थापन केला असून, त्या माध्यमातून ते जिल्ह्यातून कलावंतांना या मोहिमेत जोडून घेत आहेत. १३६८ ग्रामपंचायतींमधील गावागात चित्रे रंगविण्याचे मोठे आव्हान जिल्हा परिषदेपुढे आहे. यामध्ये शौचालये, पाणी, रस्ते स्वच्छतेबरोबरच दैनंदिन स्वच्छतेबाबत ग्रामीण भागातील महिला, पुरुष आणि लहान मुलांना स्वच्छता मोहिमेची माहिती चित्रातून कळावी यासाठी चित्रकारांना रंगाच्या माध्यमातून गावातील भिंतींचा कॅनव्हास करावा लागत आहे. त्यामुळे कलाकौशल्य आत्मसात केलेल्या कलावंतांचा शोध घेऊन या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेला मोठी मेहनत घ्यावी लागत आहे.