खोदलेल्या खड्ड्यांमध्ये रोपांची शोधाशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:09 AM2018-08-29T01:09:24+5:302018-08-29T01:10:04+5:30

वनमहोत्सवानिमित्ताने विविध शासकीय अस्थापनांच्या माध्यमातून रोपे लागवड करण्यात आली; मात्र लावलेल्या रोपांचे संवर्धन रामभरोसेच असून, कश्यपी धरणाच्या परिसरात जलसंपदा खात्याच्या जागेत हजारो रोपे लावण्यात आल्याचा दावा जरी केला जात असला तरी या परिसरात खोदलेल्या खड्ड्यांमध्ये रोपांची शोधाशोध करावी लागते. मंगळवारी (दि.२८) दुपारी दीड वाजेच्या सुमारास भेट दिली असता काही मोजक्याच खड्ड्यांमध्ये रोपे दिसली तर बहुतांश खड्डे नुसतेच ओस पडल्याचे चित्र नजरेस पडले.

Hunt for plants in excavated pits | खोदलेल्या खड्ड्यांमध्ये रोपांची शोधाशोध

खोदलेल्या खड्ड्यांमध्ये रोपांची शोधाशोध

Next

नाशिक : वनमहोत्सवानिमित्ताने विविध शासकीय अस्थापनांच्या माध्यमातून रोपे लागवड करण्यात आली; मात्र लावलेल्या रोपांचे संवर्धन रामभरोसेच असून, कश्यपी धरणाच्या परिसरात जलसंपदा खात्याच्या जागेत हजारो रोपे लावण्यात आल्याचा दावा जरी केला जात असला तरी या परिसरात खोदलेल्या खड्ड्यांमध्ये रोपांची शोधाशोध करावी लागते. मंगळवारी (दि.२८) दुपारी दीड वाजेच्या सुमारास भेट दिली असता काही मोजक्याच खड्ड्यांमध्ये रोपे दिसली तर बहुतांश खड्डे नुसतेच ओस पडल्याचे चित्र नजरेस पडले.  धोंडेगावजवळ कश्यपी धरणाच्या परिसराला लागून असलेल्या डोंगराळ भागावर एका खासगी कंपनीच्या प्रयोजनामार्फत हजारो खड्डे खोदले गेले. खड्डे खोदताना कुठल्याहीप्रकारे रोपे लागवडीचा शास्त्रीय अभ्यास करण्यात आल्याचे दिसत नाही. थेट जेसीबीने पाच ते सात फुटांचे खड्डे खोदून या खड्ड्यांमध्ये अवघे काही दिवस वाढीचे लहान आकाराची रोपे लावण्यात आली. त्यामुळे ज्या खड्ड्यांमध्ये रोपे लावली गेली त्या रोपांच्या भोवती त्यांच्या आकारमानापेक्षा अधिक मातीची भर पडली परिणामी रोपे मातीखाली गाडली गेली. रोपे आणि  खड्ड्यांवर करण्यात आलेला खर्च पाण्यात गेल्याचे चिन्ह आहेत. करंज, आवळा, कांचन या प्रजातीच्या रोपांची निवड या ठिकाणी करण्यात आली. मात्र खड्डे मोठे आणि रोपे लहान झाल्याने वृक्षारोपणाचा उपक्रम केवळ फार्स ठरला. जलसंपदा विभागाच्या परवानगीने करण्यात आलेल्या या वृक्षारोपणाचा उद्देश अपूर्णच राहणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
पिशव्यांसह रोपांची लागवड
कश्यपी धरणाच्या परिसरात खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये रोपे लागवड करताना अत्यंत निष्काळजीपणा संबंधितांकडून दाखविला गेल्याचे उघड झाले. मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास या ठिकाणी भेट दिली असता खड्ड्यांची पाहणी करताना काही खड्ड्यांमध्ये रोपवाटिके तून आणलेली रोपे पिशवीसह खड्ड्यात ठेवून माती  ढक लून देण्यात आली आहे.
वर्षभरापासून खड्ड्यांना रोपांची प्रतीक्षा
या जागेत वर्षभरापासून खड्डे खोदण्यात आले होते; मात्र रोपे लागवडीचा मुहूर्त मिळत नसल्याने मागील महिन्यापर्यंत खड्ड्यांना रोपांची प्रतीक्षा होती. जुलै महिन्यात रोपे येथील काही खड्ड्यांमध्ये लावण्यात आली, मात्र यावेळी शास्त्रीय पद्धतीकडे दुर्लक्ष केले गेल्याने लावलेली रोपे जगण्याची चिन्हे कमीच आहे. तसेच काही खड्ड्यांना अद्याप रोपांची प्रतीक्षा असून खड्डे ओस पडलेले आहेत.
रोपे जगणार की नाही?
रोपांची लागवड केली गेली असली तरी ती काही खड्ड्यांपुरतीच मर्यादित आहे. ही लागवडही अशास्त्रीय पद्धतीने करण्यात आल्यामुळे रोपे वाढतील की नाही, याबाबत संभ्रमच आहे. कारण रोपे लावताना अत्यंत निष्काळजीपणा दाखविण्यात आला आहे. खड्ड्यांचा आकार खूप मोठा आणि त्या तुलनेत रोपे लहान अशी अवस्था या ठिकाणी पहावयास मिळते.

Web Title: Hunt for plants in excavated pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.