शाळांकडून विद्यार्थ्यांची शोधाशोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:44 AM2019-04-23T00:44:12+5:302019-04-23T00:45:27+5:30
खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालक व विद्यार्थ्यांचा वाढता कल आणि खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे घटत चाललेले प्रमाण यामुळे विविध शाळांकडून विद्यार्थ्यांची शोधाशोध सुरू आहे.
नाशिक : खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालक व विद्यार्थ्यांचा वाढता कल आणि खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे घटत चाललेले प्रमाण यामुळे विविध शाळांकडून विद्यार्थ्यांची शोधाशोध सुरू आहे.
विशेष म्हणजे अशा शाळांनी उन्हाळी सुट्यांमध्ये शिक्षकांवर विद्यार्थी शोधण्याची कामगिरी सोपविली असून, आगामी शैक्षणिक वर्षात नोकरी टिकवायची असेल, तर निश्चित करून दिलेल्या किमान विद्यार्थ्यांचा प्रवेश करून घ्या, असा अलिखित आदेशत काही खासगी शिक्षण संस्थाचालकांनी शिक्षकांना दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये शाळेसाठी प्रवेश मिळविण्यासाठी चुरस दिसून येत असून, शाळेच्या परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन विद्यार्थ्यांचा शोध घेण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.
शिक्षण शास्त्रातील पदविका व पदवी (डी.एड., बी.एड.) झाल्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी मिळालेली अल्पवेतनाची अथवा मानधनाची नोकरी टिकविण्यासाठी शालेय शिक्षकांना मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागत आहे. नोकरीच्या भीतीने शहरासह ग्रामीण भागातील खासगी शाळांच्या शिक्षकांना रणरणत्या उन्हात विद्यार्थ्यांची शोधाशोध करावी लागते आहे. विशेष म्हणजे खासगी शाळा या पूर्णपणे विद्यार्थ्यांकडून मिळाव्या शुल्कावर सुरू असल्याने शिक्षकांचे वेतन अथवा मानधनही यातूनच मिळते त्यामुळे विद्यार्थ्यांची शोधाशोध करून शाळांमध्ये प्रवेश मिळविणे ही शिक्षकांची अपरिहार्यता झाली आहे.
विद्यार्थ्यांचा तुटवडा
मागील दहा, पंधरा वर्षांपासून डी.एड.ची पदवी घेणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहेत. त्या तुलनेत सरकारी शाळांमध्ये भरतीच्या जागा अगदी शेकडोच्या घरात असल्याने पदवी घेतलेले हे लाखो शिक्षक नाईलाजाने खासगी शाळांमध्ये नोकरी करतात, तर दुसरीकडे गल्लीबोळात खासगी शाळांचे पेव फुटल्याने विद्यार्थ्यांची विभागणी होत आहे. विद्यार्थींच्या पटसंख्या टिकवण्यासाठी शाळांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यामुळे संस्थाचालकांना शिक्षक उपलब्ध होत असले तरी विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागत आहे.
यात ग्रामीण भागात या शिक्षकांना काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असला तरी शहरात शाळांची संख्या अधिक असल्याने अनेक पर्याय तसेच बहुतांश शाळांचे शुल्क पालकांना झेपणारे नसल्याने शिक्षकांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. त्यामुळे शिक्षकांत नाराजी दिसत होती़