पेटलेल्या धावत्या कारमधील पती-पत्नी बचावले; ओव्हरटेक करणारा वाहनचालक ठरला देवदूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:19 IST2025-04-04T17:19:28+5:302025-04-04T17:19:49+5:30

नांद्रे दाम्पत्यासाठी ओव्हरटेक करून आलेला वाहनचालक हा एक प्रकारे देवदूत ठरला.

Husband and wife escape from burning car | पेटलेल्या धावत्या कारमधील पती-पत्नी बचावले; ओव्हरटेक करणारा वाहनचालक ठरला देवदूत

पेटलेल्या धावत्या कारमधील पती-पत्नी बचावले; ओव्हरटेक करणारा वाहनचालक ठरला देवदूत

Nashik Car Accident : नाशिक शहरातील इंदिरानगर बोगद्याजवळ जॉगिंग ट्रॅकच्या वळणावर धावत्या कारने अचानकपणे पेट घेतल्याची घटना गुरुवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच शिंगाडा तलाव येथील अग्निशमन मुख्यालयातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतल्याने अनर्थ टळला. या दुर्घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र सुदैवाने कारमध्ये प्रवास करणारे पती-पत्नी बचावले.

गोविंदनगरमध्ये राहणारे व्यावसायिक विजय नांद्रे हे त्यांच्या पत्नीसह कारमधून इंदिरानगरकडे प्रवास करत होते. पेट्रोलपंपापासून उड्डाणपुलाखालून यू-टर्न घेऊन ते इंदिरानगरच्या दिशेने प्रवास करत होते. यावेळी अचानकपणे त्यांच्या कारमधून धुराचे लोट उठल्याचे लक्षात येताच त्यांनी समांतर रस्त्यावर कार आणली. कारमधून नांद्रे दाम्पत्य तातडीने उतरले अन् काही मिनिटांत कारच्या समोरील बाजूने आगीच्या ज्वाला भडकल्या. क्षणार्धात आगीने रुद्रावतार धारण केला. नांद्रे यांनी त्यांचे इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या मित्राशी संपर्क करून माहिती दिली. त्यांनी त्वरित अग्निशमन दलाला कळविले. मुख्यालयातून लिडिंग फायरमन उदय शिर्के, नितीन म्हस्के, गणेश म्हस्के, गणेश गायधनी आदींनी धाव घेत पाच मिनिटांत घटनास्थळ गाठले. तातडीने पाण्याचा वेगवान मारा सुरू करून आग विझवली.

ओव्हरटेक करणारा वाहनचालक ठरला देवदूत

इंदिरानगरकडे महामार्गाने नांद्रे प्रवास करत असताना त्यांच्या पाठीमागून एक कारचालक प्रवास करत होता. नांद्रेच्या कारमधून धूर अन् ठिणग्या उडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने त्याच्या कारचा वेग वाढवून तत्काळ नांद्रे यांना ही बाब लक्षात आणून दिली. यामुळे ते वेळीच सावध होऊ शकले आणि त्यांनी तातडीने प्रसंगावधान राखून कार त्वरित बाजूला घेत उभी केली आणि सोबत असलेल्या पत्नीला तत्काळ दरवाजा उघडून खाली उतरण्यास सांगितले. नांद्रे दाम्पत्यासाठी ओव्हरटेक करून आलेला वाहनचालक हा एक प्रकारे देवदूत ठरला. या दुर्घटनेत कार निम्म्यापेक्षा जास्त जळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अनर्थ टळला. यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती.
 

Web Title: Husband and wife escape from burning car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.