नाशिकच्या इंदिरानगरमध्ये पती-पत्नीने घेतला गळफास; मुलीलाही विष पाजल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 02:29 PM2024-09-18T14:29:46+5:302024-09-18T14:30:00+5:30
इंदिरानगरमधील सराफ नगर हा उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात प्रतिगंगा रो-हाऊसमध्ये सहाणे कुटुंबीय वास्तव्यास आहे.
- संजय शहाणे
नाशिक : येथील इंदिरानगर भागातील सराफनगर परिसरात असलेल्या एका रो-हाऊसमध्ये पती-पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली. त्याच खोलीत त्यांची दहा वर्षांची मुलगीसुद्धा पलंगावर मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. बुधवारी (दि.१८) सकाळी शेजाऱ्यांनी जेव्हा दरवाजाला धक्के मारून उघडले, तेव्हा हा हृदयद्रावक घटना समोर आली. इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तीघांच्या आत्महत्येमागील गुढ कायम आहे. विजय माणिक सहाणे (४१), ज्ञानेश्वरी सहाणे (३३), अन्यया सहाणे (१०) अशी तीघा मृतांची नावे आहेत.
इंदिरानगरमधील सराफ नगर हा उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात प्रतिगंगा रो-हाऊसमध्ये सहाणे कुटुंबीय वास्तव्यास आहे. विजय सहाणे हे सातपूर एमआयडीसी मधील एका कंपनीत नोकरी करत होते. ते त्यांचे वृद्ध आई,वडील, पत्नी, मुलगीसह याठिकाणी वास्तव्यास होते. अज्ञात कारणातून त्यांनी तसेच पत्नीते स्वत:चे आयुष्य संपविले. या दोघांनी मिळून मुलीलाही ठार मारल्याचा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे. मुलीच्या तोंडावर चिकटपट्टी लावलेली पंचनाम्यात आढळली, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमागील कोणतेही ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. घरात कुठल्याहीप्रकारची चिठ्ठी वगैरे आढळून आली नाही, असे पोलिसांनी सांगितले. प्रारंभी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
..असा झाला उलगडा
बुधवारी सकाळी विजय सहाणे यांचे आई-वडिल उठले. माणिक सहाणे यांनी मुलाला व सूनेला हाका मारल्या मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. म्हणून ते खालून वरच्या मजल्यावर त्यांच्या खाेलीचे दार वाजविण्यासाठी गेले. जोरजोराने दार वाजवूनसुद्धा कुठलाही प्रतिसाद आतमधून येत नसल्याचे बघून त्यांनी शेजारींची मदत घेतली. शेजारचे काही लोक त्यांच्या घरी आले. त्यांनीही दरवाजा जोरजोराने वाजविला. नंतर दरवाजाला धक्के देऊन तो तोडला. त्यावेळी छताला सुती दोरीच्या साह्याने पती-पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आले अन खोलीतील पलंगावर मुलगीही निपचित पडलेली होती. तातडीने नागरिकांनी पोलिसांना माहिती कळविली.