ट्रकच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार; दोन अपघातांत तिघांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 07:55 PM2020-10-21T19:55:11+5:302020-10-21T19:55:57+5:30
जेलरोड कोठारी कन्या शाळा येथे रस्ता ओलांडताना दुचाकी-ट्रकमध्ये अपघात होऊन लाखलगाव येथील पती-पत्नी ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना घडली.
नाशिक : शहरातील जेलरोड व आडगाव शिवारात महामार्गालगत भरधाव ट्रक व कंटेनरच्या धडकेत दुचाकीने प्रवास करणाऱ्या एका दाम्पत्यासह दुसऱ्या प्रवासी महिलेचा बुधवारी (दि.२१) जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जेलरोड कोठारी कन्या शाळा येथे रस्ता ओलांडताना दुचाकी-ट्रकमध्ये अपघात होऊन लाखलगाव येथील पती-पत्नी ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना घडली. नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील लाखलगाव येथील चंद्रभान अशोक जाधव (४१) व त्यांची पत्नी मनीषा चंद्रभान जाधव (३८) हे दोघे बुधवारी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास भारत प्रतिभूती मुद्रणालयाकडून कोठारी कन्या शाळेजवळून त्यांच्या दुचाकीने (एम.एच.१५ एफवाय ७२०३) मार्गस्थ होत जेलरोडकडे वळण घेत होते. यावेळी जेलरोडकडून बिटकोकडे येणारा ट्रक (एमएच०४ डीएस ३५१४) व जाधव यांच्या दुचाकीमध्ये अपघात झाला. यामध्ये चंद्रभान व त्यांची पत्नी मनीषा जाधव हे दोघेही ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त दोन्ही वाहने व ट्रकचालक शेख हसन भिकन (रा. सिन्नर) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत चंद्रभान जाधव यांच्या पश्चात आई, दोन लहान मुले, भाऊ, भावजई असा परिवार आहे.
आडगावला कंटनेरच्या धडकेत महिला ठार
मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात असलेल्या हॉटेल जत्रा चौफुलीवर पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटनेरने रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुका येथील महिला जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत कंटेनर चालकाविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात राहणारे खंडू बाळू आगविले व त्यांची पत्नी निर्मला खंडू आगविले हे दाम्पत्य औरंगाबाद येथून घोटी-इगतपुरीला जात असताना हॉटेल जत्रा चौफुलीजवळ त्यांची दुचाकी (एमएच २० सी जी ५३८६) उभी केली असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दहाचाकी अवजड कंटेनरच्या ( एम एच.१५ ईजी ४७९१) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीजवळ उभ्या असलेल्या निर्मला गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या पतीने तत्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली अपघाताबाबत सिन्नर येथील कंटेनरचालक अशोक रावबा चकोर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.