नाशिकमध्ये नवऱ्याने बायकोचा केला खून: कोयता, कुकरच्या झाकणाने डोक्यात प्रहार
By अझहर शेख | Updated: February 4, 2025 21:17 IST2025-02-04T21:17:02+5:302025-02-04T21:17:33+5:30
बायकोच्या डोक्यात कोयता व कुकरच्या झाकणाने वार करून खून

नाशिकमध्ये नवऱ्याने बायकोचा केला खून: कोयता, कुकरच्या झाकणाने डोक्यात प्रहार
नाशिक : घरातील आपआपसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी (दि.४) राहत्या घरात बायकोच्या डोक्यात कोयता व कुकरच्या झाकणाने वार करून खुन केला. गंगापुररोडवरील डी.के नगरातील स्वास्तिक निवास सोसायटीमध्ये ही घटना दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. सविता छत्रगुन गोरे (४५) असे मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गंगापुररोडवरील डी.के.नगर भागात असलेल्या स्वास्तिक निवास (बी-विंग) सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरील गोरे दाम्पत्य हे मुलासह भाडेतत्वावर सदनिकेत राहत होते. मंगळवारी मुलगा हा सकाळी कामावर निघून गेल्यानंतर सविता-छत्रगुन हे पती-पत्नी घरात एकटेच होते. दुपारी पती-पत्नीमध्ये भांडण झाले. यावेळी छत्रगुन गोरे (५०) याने रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात कोयता व कुकरचे झाकणाने जोरदार प्रहार केला. यामुळे सविता गोरे या रक्तबंबाळ अवस्थेत लाकडी पलंगावर कोसळल्या. यावेळी त्यांची विवाहित मुलगी फिर्यादी मुक्ता बालाजी लिखे ही त्याचवेळी घरी आल्यानंतर दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा वाजविल्यानंतर तिचे वडील छत्रगुन यांनी दरवाजा उघडला असता आई रक्तबंबाळ अवस्थेत बेडरूममध्ये पडलेली आढळून आली. तेथून तोपर्यंत छत्रगुन हा फरार झाला होता. मुक्ता हिने शेजाऱ्यांचे दार वाजवून मदत मागितली यावेळी रहिवाशांनी धाव घेतली. तोपर्यंत सविता या निपचित पडलेल्या होत्या. साेसायटीतील लोकांनी घटनेची माहिती पोलिसांनी कळविली. माहिती मिळताच गंगापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुशील जुमडे, पोलीस निरिक्षक जग्वेंद्रसिंह राजपुत यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकिय जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. मुक्ता लिखे हिने दिलेल्या फिर्यादीवरून छत्रगुन याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा सायंकाळी दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गंगापूर पोलिस करत आहेत.