पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:19 AM2018-10-25T01:19:31+5:302018-10-25T01:20:14+5:30
माहेरून हुंड्याचे एक लाख रुपये घेऊन येत नाही तसेच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत शिवीगाळ व मारहाण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अमोल निकम (रा़ मंगलमूर्तीनगर, जेलरोड) यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी़ पी़ देशमुख यांनी मंगळवारी (दि़२३) पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील एस़ बी़ सरोदे यांनी या खटल्यात काम पाहिले़
नाशिक : माहेरून हुंड्याचे एक लाख रुपये घेऊन येत नाही तसेच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत शिवीगाळ व मारहाण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अमोल निकम (रा़ मंगलमूर्तीनगर, जेलरोड) यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी़ पी़ देशमुख यांनी मंगळवारी (दि़२३) पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील एस़ बी़ सरोदे यांनी या खटल्यात काम पाहिले़ उपनगर परिसरातील रहिवासी उषा पगारे (जेलरोड) यांची मुलगी रेश्मा हिचा विवाह तिच्या सख्ख्या आत्याचा मुलगा अमोल निकमसोबत २००६ मध्ये झाला होता़ हुंड्याचे एक लाख रुपये आणत नाही तसेच चारित्र्यावर संशय घेऊन अमोल हा शिवीगाळ व मारहाण करीत होता़ या त्रासास कंटाळून २ नोव्हेंबर २०११ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पती अमोल निकम, सुमन निकम (सासू), मधुकर निकम (सासरे), रत्नप्रभा निकम, राहुल निकम, उज्ज्वला बर्वे, हेमंत बर्वे यांच्याविरोधात विवाहिता छळ तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ न्यायाधीश देशमुख यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील सरोदे यांनी सात साक्षीदार तपासले़ त्यामध्ये मयत रेश्मा हिस पती अमोल याने केलेली मारहाण, उपचार सुरू असलेली वैद्यकीय कागदपत्रे, साक्षीदारांची साक्ष याद्वारे पती अमोल यास दोषी धरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा सुनावली़ तर उर्वरित आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली़