पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीला ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:15 AM2021-05-13T04:15:41+5:302021-05-13T04:15:41+5:30
सय्यद पिंपरी रस्त्यावर आडगाव शिवारातील येथील एका शेतात मोलमजुरी करत उदरनिर्वाह करणाऱ्या पवार दाम्पत्यामध्ये खटके उडाले. ११ ऑगस्ट ...
सय्यद पिंपरी रस्त्यावर आडगाव शिवारातील येथील एका शेतात मोलमजुरी करत उदरनिर्वाह करणाऱ्या पवार दाम्पत्यामध्ये खटके उडाले. ११ ऑगस्ट २०१० रोजी दोघांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी संशयित पवार याने त्याची पत्नी गुणीबाई पवार (४५) हिच्या डोक्यात लोखंडी फावड्याने हल्ला केल्यामुळे ती जागीच ठार झाली. या घटनेनंतर पवार हा फरार झालेला होता. खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, तो कुठेही मिळून आला नाही. पवार मूळ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचओहळ येथे राहणारा असून तो पहिल्यापासून मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरी काम करायचा पोलिसांनी त्याच्या मूळ गावीदेखील त्याचा शोध घेतला असता पवार हा गावाकडे येतच नसल्याने कदाचित तो मृत झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार गुन्हे शोधपथकाने काही महिन्यांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचओहळ येथे जाऊन संशोधनाबाबत विचारपूस केली असता पवार दिंडोरी तालुक्यातील डंबाळेवाडी येथे एका शेतात मोलमजुरी करत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या केवळ नावावरून शोध घेतला असता तो डंबाळेवाडीत आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ११ वर्षांपूर्वी पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची कबुली त्याने दिली. पवार यास बुधवारी (दि.१२) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.