सदस्याच्या पतीचा समितीच्या कामकाजात हस्तक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:12 AM2020-02-01T00:12:29+5:302020-02-01T00:15:39+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या मासिक सभेत समिती सदस्य महिलेऐवजी त्यांच्या पती महाशयांनीच विषय मांडून चर्चेत सक्रिय सहभाग घेतल्यावरून वाद होऊन जोरदार खडाजंगी झाली. महिला सदस्याच्या पतीचा बैठकीशी काहीही संबंध नसताना त्यांना चर्चेत सहभागी होवू देऊ नये, अशी मागणी करून संतप्त झालेल्या महिला सदस्याने सभात्याग करीत थेट जिल्हा परिषद अध्यक्षांकडे झेरॉक्स सदस्याबाबत तक्रार केली. सुमारे अर्धातासापेक्षा अधिक वेळ चाललेल्या या वादाची जोरदार चर्चा जिल्हा परिषदेत झडली.
लोकमत न्यूज नेटवर्क

शिक्षण समितीची सूत्रे स्वीकारल्यानंतर सभापती सुरेखा दराडे यांच्या अध्यक्षतेखाली महिलीच मासिक सभा गुरुवारी सकाळी घेण्यात आली. बैठकीतील नियमित विषयांना सुरुवात झाल्यानंतर समिती सदस्य सुनीता पठाडे यांचे पती मच्छिंद्र पठाडे यांनी बैठकीतील चर्चेत सहभागी होऊन शिक्षण क्षेत्राविषयी विषय मांडून चर्चा सुरू केली. बऱ्याच वेळ त्यांनी शाळा, शिक्षक आदी विषयांवर चर्चा सुरू ठेवल्याने त्यांच्या या हस्तक्षेपाला राष्टÑवादीच्या सदस्य नूतन आहेर यांनी हरकत घेतली. महिला सदस्य सुनीता पठाडे बैठकीत हजर असताना त्यांच्याऐवजी पती पठाडे हे कोणत्या अधिकारान्वये विषय मांडत आहेत? असा प्रश्न आहेर यांनी उपस्थित केला. मच्छिंद्र पठाडे यांना सभापतींशी चर्चा करायची असेल तर बैठकीनंतर करावी, असे आहेर यांनी सांगितल्यावर पठाडे पती-पत्नीने त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. क्षीरसागर यांनी या संदर्भात सभापतींशी आपण बोलू असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जवळपास पाऊण तासानंतर नूतन आहेर यांनी पुन्हा शिक्षण समितीच्या कामकाजात भाग घेऊन मच्छिंद्र पठाडे यांनी समितीच्या सभेत मांडलेल्या मुद्द्यांची इतिवृत्तात नोंद घेण्यात यावी, अशी मागणी सभापतींकडे केली. परंतु सभापती दराडे यांनी नकार दिला. या सभेत आहेर यांनी शाळा दुरुस्ती तातडीने करण्यात यावी तसेच पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना पेन व वही नीट हाताळता येत नसल्याने विद्यार्थ्यांना पाटी वापरण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी केली. समितीच्या सभेत बेकायदेशीरपणे काम होत असल्याची तक्रार करून जोपर्यंत पठाडे बसतील तोपर्यंत आपण समितीच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याचे सांगून आहेर यांनी सभात्याग केला व थेट अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्याकडे तक्रार केली. महिला सदस्यांचे पती जिल्हा परिषदेच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असतील तर महिला आरक्षणाचा काय उपयोग? असा सवाल त्यांनी केला.