नाशिककरांना भरली हुडहुडी; पारा १०.६ अंशापर्यंत घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 02:38 PM2020-11-11T14:38:30+5:302020-11-11T14:41:54+5:30
शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. किमान तापमानाचा पाराही आता वेगाने घसरु लागला आहे. १६ अंशांच्या जवळपास स्थिरावणारा पारा आता या आठवड्यात थेट १० अंशापर्यंत खाली आल्यामुळे दिपावलीच्या तोंडावर शहरात थंडीचा मुक्काम
नाशिक : शहर व परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. बुधवारी (दि.११) शहराच्या किमान तापमानाचा पारा थेट १०.६अंशापर्यंत घसरला. नाशिककरांना पहाटेपासूनच थंडीची तीव्रता जाणवयास लागली होती. सकाळी आठ वाजेपर्यंत शहर धुक्यात हरविले होते. थंडीची तीव्रता वाढताच जॉगर्सचा उत्साही सळसळू लागला असून सकाळी फेरफटका मारणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचे बुधवारी पहावयास मिळाले.
शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. किमान तापमानाचा पाराही आता वेगाने घसरु लागला आहे. १६ अंशांच्या जवळपास स्थिरावणारा पारा आता या आठवड्यात थेट १० अंशापर्यंत खाली आल्यामुळे दिपावलीच्या तोंडावर शहरात थंडीचा मुक्काम राहणार आहे. थंडीच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिकांनी उबदार कपडे आता अडगळीतून बाहेर काढले आहे. ऊबदार कपड्यांवरील धुळ झटकत त्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. उबदार कपड्यांद्वारे थंडीच्या तीव्रतेपासून स्वत:चा बचाव करताना नाशिककर नजरेस पडू लागले आहे. यावर्षी पावसाळा लांबल्याने थंडीचे आगमनदेखील उशिराने होईल, असे वाटत होते; मात्र अचानकपणे थंडीची चाहूल या महिन्यात नागरिकांना जाणवू लागली आणि एक आठवडा उलटत नाही तोच पारा थेट १० अंशापर्यंत खाली आला. यामुळे थंडीचा कडाका चांगलाच जाणवला. किमान तापमानासह कमाल तापमानही मंगळवारपासून घसरताना दिसत आहे.