झोपडीधारकांचे सर्वेक्षण

By admin | Published: March 4, 2017 01:36 AM2017-03-04T01:36:39+5:302017-03-04T01:36:52+5:30

नाशिक : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांतून चार दिवसांत ११ हजार ७८३ अर्जांची विक्री झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे

Hut surveyor | झोपडीधारकांचे सर्वेक्षण

झोपडीधारकांचे सर्वेक्षण

Next

 नाशिक : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांतून चार दिवसांत ११ हजार ७८३ अर्जांची विक्री झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, सदर योजनेत झोपडपट्टीतील रहिवाशांचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण केले जाणार असल्याने त्यांनी रांगेत उभे राहून सध्या अर्ज करण्याची गरज नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चार घटकांमध्ये घरकुलांचा लाभ दिला जाणार आहे. सदर घरकुले हे मोफत नसून त्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.
झोपडपट्टीतील रहिवाशांचे मात्र प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सन २००७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार महापालिका हद्दीत १६८ झोपडपट्ट्या आहेत. त्यातील २९ झोपडपट्ट्यांतील रहिवाशांना यापूर्वीच्या सरकारमार्फत जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान अभियानांतर्गत शहरी गरिबांसाठी मूलभूत सुविधा या योजनेनुसार घरकुलांचा लाभ देण्यात आलेला आहे. मात्र, या झोपडपट्ट्यांतील विस्तारीत कुटुंबांना मात्र प्रधानमंत्री आवास योजनेत डिमांड सर्वेक्षणात सहभागी करून घेतले जाणार आहे. दरम्यान, महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यासाठी शहरातील सहाही विभागात २० रुपयांत अर्ज विक्री सुरू केली आहे. महापालिकेने त्यासाठी सुमारे १६ हजार अर्ज उपलब्ध करून दिले असून, चार दिवसांत ११ हजार ७८३ अर्जांची विक्री झाली आहे.
त्यात पश्चिम - २५७५, पंचवटी- २४५४, पूर्व- २५००, नाशिकरोड- १०२०, सातपूर- १८६५ आणि सिडको-१३९९ या प्रमाणे अर्जांचा समावेश आहे. ३१ मार्चपर्यंत अर्ज विक्री विभागीय कार्यालयांमध्ये सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. झोपडपट्टीतील रहिवाशांचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन टॅबमार्फत सर्वेक्षण करून नोंदणी केली जाणार आहे. परंतु, झोपडपट्टीतील रहिवाशीही विभागीय कार्यालयांमध्ये अर्जासाठी गर्दी करताना दिसून येत आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील रहिवाशांनी रांगेत उभे राहून गर्दी करू नये, यासाठी मनपाचे कर्मचारी लोकांना आवाहन करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Hut surveyor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.