संत नामाचा जयघोष
By Admin | Published: June 22, 2016 11:50 PM2016-06-22T23:50:31+5:302016-06-23T00:02:46+5:30
नाशिकरोड परिसर : टाळ, मृदुंगाच्या ठेक्यावर वारकऱ्यांनी धरला फेर
नाशिकरोड : पंढरपूरला विठोबारायाच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरहून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे बुधवारी दुपारी नाशिकरोड परिसरात जोरदार स्वागत करण्यात आले. अभंग, भजन व संतनामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे बुधवारी दुपारी साडेबारा वाजता बिटको चौकात आमदार योगेश घोलप, व्यापारी बॅँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, नाशिकरोड प्रभाग सभापती सूर्यकांत लवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी निवृत्ती अरिंगळे, सुधाकर जाधव, मनोहर कोरडे, राजु लवटे, प्रिन्सी लांबा, श्रीराम गायकवाड, केशव पोरजे, एकनाथ कदम, श्रीकांत हांडोरे, विश्वनाथ बुवा, संजय पागेरे, संतोष चव्हाण, शंकरराव औशिकर आदिंसह भाविक उपस्थित होते.
मुक्तिधाममध्ये पूजा
मुक्तिधाम मंदिरात पालखी दाखल झाल्यानंतर प्रथेप्रमाणे श्रीराम-लक्ष्मण-सीतेच्या मंदिरात संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांची मूर्ती व पालखीची चौव्हाण कुटुंबीयांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. मंदिरामध्ये वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाच्या आवाजावर ठेका धरत फुगड्या खेळत अभंग, भजन, संताच्या नामाचा जयघोष केल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिरामध्ये श्री निवृत्तिनाथ महाराजांची मूर्ती, पादुका व रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारच्या विश्रांतीनंतर पालखी पळसे येथे मुक्कामासाठी हरिनामाचा गजर करत रवाना झाली.
उपनगर नाक्यावर स्वागत
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे उपनगर नाका येथे श्री इच्छामणी गणेश मंदिर ट्रस्ट, इच्छामणी महिला मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. पालखीच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. स्वागताप्रसंगी महिला भजनी मंडळाच्या सदस्यांनी टाळ-मृदुंगाच्या तालावर फुगड्यांचा फेर धरला होता. यावेळी वारकऱ्यांना खिचडीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुमन ओहोळ, प्रा. कुणाल वाघ, नगरसेवक विजय ओहोळ, अनिल ताजनपुरे, रवि पगारे, विक्रम कदम, सतबिरसिंग दहीया, महेश बनसिंघानी, विजय सोमवंशी, संजय लोखंडे, राजू काळे, हेमंत पवार, आदि उपस्थित होते. तसेच नाशिक-पुणे महामार्गावर शिवाजीनगर, दत्तमंदिर सिग्नल आदि ठिकाणी स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)