भुजबळ, कांदे-राऊत यांच्यात ह्यनुरा कुस्तीह्ण तर सुरू नाही ना? नांदगावचे निमित्त करून सेना भुजबळांवरील नाराजीचा सूर आळवतेय; भुजबळांचे जशास तसे उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 01:36 AM2021-10-31T01:36:01+5:302021-10-31T01:51:21+5:30
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नांदगाव मतदारसंघातील लोकांना शासकीय मदतनिधीवरून आमदार सुहास कांदे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात सुरू झालेला वाद आता रंगात आलेला असला तरी तुटेपर्यंत ताणले जाणार नाही, अशी दक्षता दोन्ही प्रमुख नेत्यांकडून घेतली जात आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नांदगाव मतदारसंघातील लोकांना शासकीय मदतनिधीवरून आमदार सुहास कांदे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात सुरू झालेला वाद आता रंगात आलेला असला तरी तुटेपर्यंत ताणले जाणार नाही, अशी दक्षता दोन्ही प्रमुख नेत्यांकडून घेतली जात आहे. राजकीय जुगलबंदीमध्ये ज्येष्ठत्व-कनिष्ठत्व, मंत्रिपद, पालकत्व असे मुद्दे आणून प्रसिद्धीचा झोत राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर तसेच भुजबळ, राऊत-कांदे यांच्यावर राहील, असे सूत्र दिसून येत आहे. त्यामुळेच ह्यनुरा कुस्तीह्णची शक्यता बळावत आहे. या दोघांमधील वादात प्रेक्षकांची भूमिका बजावणारे प्रतिस्पर्धी पक्ष रिंगणाबाहेर तर जाणार नाही ना, याची काळजी त्यांनी करण्याची आवश्यकता आहे.
नांदगावच्या मदतनिधीचे पुराण एवढे लांबेल, असे कोणालाही वाटत नव्हते. पण, ते लांबले आहे. न्यायालयीन याचिकेपासून तर शिवसेनेत ज्येष्ठ कोण इथपर्यंत वादाचे मुद्दे पोहोचले आहेत. नांदगावला जायचे की नाही, याविषयी आता शरद पवार यांनाच विचारावे लागेल, हे भुजबळांचे वक्तव्य सेनेला इशारा देणारे आहे. अर्थात, ही ह्यनुरा कुस्तीह्ण असल्याचा संशय बळावतो, तो याच ठिकाणी. संपूर्ण जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्ह्यात शक्तिशाली आहे. त्यापाठोपाठ सेनेचे बळ आहे. ताकद आजमावण्याची दोघांना संधी आहे. त्यादृष्टीने या दोन्ही पक्षांचे दिग्गज नेते म्हणून छगन भुजबळ आणि संजय राऊत हे वातावरणनिर्मिती करीत आहेत. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जोशात आहेत. त्याचा लाभ निवडणुकीत मिळविण्याचा दोघांचा प्रयत्न दिसतो.
तुटेपर्यंत ताणले जाणार नाही
भुजबळ हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ओबीसींचे नेते आहेत. मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकची धुरा त्यांच्याकडे सोपवली आहे. पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. भुजबळ यांनीही संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय व प्रशासकीय यंत्रणेवर प्रभुत्व ठेवले आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्ष स्पर्धक नसले तरी निवडणुकीच्या रणांगणात काय होईल, ते आता सांगता येत नसल्याने प्रत्येक नेता आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. नांदगावच्या बाबतीत तर पुत्र पंकज हे सलग दोनदा आमदार राहिल्याने त्यांना जिव्हाळा वाटणे स्वाभाविक आहे. त्यांचे असलेले लक्ष हे शिवसेना व आमदार सुहास कांदे यांना खटकले असावे आणि त्यातून हे रामायण घडलेले आहे. संजय राऊत हे संपर्कनेते असल्याने त्यांनी सेनेच्या लोकप्रतिनिधीची बाजू घेणे आणि आघाडीतील असले तरी प्रतिस्पर्धी पक्षातील मंत्र्यांना ह्यपाहुणचाराह्णचा भाषा करणे हे राजकीय अपरिहार्यतेचा भाग आहे. त्यांच्या याच अपरिहार्यतेवर भुजबळांनी नेमके बोट ठेवले आहे. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येण्यासाठी शरद पवार आणि संजय राऊत हे दोघे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. या शिल्पाला तडा जाईल, असे कृत्य करू नये, अशी भावना त्यांनी व्यक्त केली, ती याच भावनेतून.
सद्यस्थितीत दोन्ही नेते मागे हटायला तयार नसले तरी तुटेपर्यंत ताणले जाणार नाही, याची दक्षता दोघेही घेताना दिसत आहेत. भुजबळ यांनी नांदगावचा विषय शरद पवार यांच्यापर्यंत नेण्याचा जाहीर मनोदय व्यक्त केला आहे. राऊत यांचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले संबंध पाहता या घडामोडी त्यांना अवगत असतीलच. त्यामुळे वाग्बाण चालत असले तरी कोणी घायाळ होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.
काँग्रेसमध्ये हालचाली तर भाजपमध्ये वाऱ्यावरची वरात
राष्ट्रवादी व शिवसेनेतील कलगीतुऱ्याचा आनंद घेणाऱ्या काँग्रेस आणि भाजपला ह्यनुरा कुस्तीह्णचा अर्थ उशिरा उमगला तर मात्र पंचाईत होईल.
पूर्व काँग्रेसी गुरुमित बग्गा यांच्या रूपाने शहर काँग्रेसला आता नेतृत्व लाभत असल्याची शक्यता दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यानंतर मुंबई व त्र्यंबकेश्वर बैठकीनंतर कॉंग्रेसमध्ये ही घडामोड झालेली दिसते. तरीही बग्गा यांच्या प्रवेश सोहळ्यावरून जे नाट्य रंगले ते अर्थात काँग्रेसच्या संस्कृतीला साजेसे होते. बग्गा यांना त्याची आता सवय करून घ्यावी लागणार आहे.
भाजपचे प्रभारी पद गिरीश महाजन यांच्याकडून जयकुमार रावल यांच्याकडे गेल्यानंतर पक्षातील चैतन्य, उत्साह हरपल्यासारखा दिसतो. निवडणुका तोंडावर आल्या असताना केशव उपाध्ये येतात, पण जयकुमार रावल यायला तयार नाहीत. रावल दोंडाईचातील गढीवरून अधूनमधून पत्रके काढतात आणि अस्तित्वाची जाणीव करून देत असतात. आताही तसेच झाले.