मी शिवसेनेच्या जुन्या प्रवाहातील, छगन भुजबळ यांचा संजय राऊत यांना टोला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 07:03 PM2021-06-19T19:03:14+5:302021-06-19T19:04:35+5:30
नाशिक : मी शिवसेेनेच्या जुन्या प्रवाहातील असून, २५ वर्षे सेनेत होतो हे लक्षात घ्या अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. त्याच बरोबर शिवसेनेला वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छाही भुजबळ यांनी देवून सेनेप्रती आपली भावना कायम असल्याचे दाखवून दिले.
नाशिक : मी शिवसेेनेच्या जुन्या प्रवाहातील असून, २५ वर्षे सेनेत होतो हे लक्षात घ्या अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. त्याच बरोबर शिवसेनेला वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छाही भुजबळ यांनी देवून सेनेप्रती आपली भावना कायम असल्याचे दाखवून दिले.
नवी मुंबईतील विमानतळाला नाव देण्यावरून सुरू असलेल्या वादाप्रसंगी पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी ‘बाळासाहेब हयात असते तर त्यांनी या विमानतळाला जे.आर.डी. टाटांचे नाव दिले असते’ अशी प्रतिक्रीया व्यक्त केली होती. त्यावर गेल्या आठवड्यात नाशिक भेटीवर आलेले खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांना शिवसेनेचा नवीन प्रवाह ठावूक नसल्याची टिका केली होती. त्यावर शनिवारी पत्रकारांनी भुजबळ यांना छेडले असता, त्यांनी आपण शिवसेनेत २५ वर्षे होतो व जुन्या प्रवाहाबाबत चांगलेच जाणून असल्याचा टोला लगावला. तसेच सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या. त्याच वेळी भुजबळ यांनी काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनाही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. ओबीसींच्या आरक्षण प्रश्नावर भाजपाने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्याबद्दल भुजबळ यांनी त्यांचे स्वागत करून निव्वळ राज्यात आंदोलन करण्यापेक्षा केंद्र सरकारकडेही त्यांनी पाठपुरावा करावा कारण ओबीसींची जनगणना हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारितील असून, या संदर्भात अनेक वेळा पत्र व्यवहार करण्यात आला परंतु त्याला उत्तर देण्यातही सरकार टाळाटाळ करीत असून, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर ओबीसी संघटनाही स्वतंत्र दावा दाखल करणार असल्याचे भुजबळ म्हणाले.
त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधी सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, अभ्यासिका सुरू करण्यासाठी पुढील आठवड्यात निर्णय घेण्याचे संकेत छगन भुजबळ यांनी दिले. नाशिक शहर दुसऱ्या टप्प्यात आले आहे असे समजायला हरकत नाही, मात्र आणखी आठ दिवस परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी निर्बंध कायम ठेवण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले.