धक्कादायक! "पत्नीवर खूप प्रेम करतो, मी तिला मुक्त..."; चिठ्ठी लिहून पतीने स्वत:ही उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:47 IST2025-04-10T13:46:55+5:302025-04-10T13:47:57+5:30
जेलरोड येथे जोशी दाम्पत्य वास्तव्यास होते. त्यांची दोन्ही मुले अन्य शहरात राहतात. लता जोशी आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होत्या.

धक्कादायक! "पत्नीवर खूप प्रेम करतो, मी तिला मुक्त..."; चिठ्ठी लिहून पतीने स्वत:ही उचलले टोकाचे पाऊल
नाशिकरोड : 'मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो, तिला आजारपणातून मुक्त करत आहोत व तीच्यासोबत मी पण मुक्त होत आहे...' अशा आशयाची मृत्युपूर्व चिठ्ठी लिहून जेलरोड भागात राहणारे सेवानिवृत्त प्राध्यापक मुरलीधर रामचंद्र जोशी (८०, रा. एकदंत अपार्टमेंट) यांनी त्यांच्या पत्नीचा गळा दाबून खून करत नंतर स्वतः ही गळफास घेत जीवन संपविल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.९) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराडचा कोर्टात अर्ज; आजच्या सुनावणीत काय घडलं?
जेलरोड येथे जोशी दाम्पत्य वास्तव्यास होते. त्यांची दोन्ही मुले अन्य शहरात राहतात. लता जोशी आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होत्या. दुपारी केअर टेकर सीमा राठोड या काम आटोपून निघून गेल्यानंतर मुरलीधर जोशी यांनी 'मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो, तिला आजारपणातून मुक्त करत आहेत...' अशी चिठ्ठी लिहून पत्नीचा गळा आवळला व स्वतःही गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास राठोड पुन्हा घरी आल्या व त्यांनी त्यांच्याजवळील किल्लीने दरवाजा उघडला असता वृद्ध दाम्पत्य मृतावस्थेत आढळले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जोशी यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामधील मजकुरावरून मुरलीधर यांनी पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे गळ्यावर असलेल्या व्रणवरून अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
'तिच्यासोबत मी पण मुक्त होत आहे....'
आत्महत्येपूर्वी मुरलीधर जोशी यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत माझे पत्नी लतावर खूप प्रेम आहे. ती अंथरुणाला खिळून असून आजाराला वैतागून गेली आहे. तिला या आजारातून मुक्त करण्यासाठी व तिच्यासोबत मी पण मुक्त होत आहे. घरकाम करणाऱ्या सीमा हिने पत्नी लता हिची खूप सेवा केली. तिच्यासाठी ५० हजार रुपये बाजूला काढून ठेवले असून ते तिला देण्यात यावे.
आमच्या दोघांच्या अंत्यसंस्काराचे पैसेदेखील ठेवले असून अंत्यसंस्कारासाठी कोणीही खर्च करू नये. तसेच पत्नी लता हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नवीन साडी, मंगळसूत्र, जोडवे असे सर्व घालून अंत्यसंस्कार करावे... असा अंगावर शहारे आणणारा मजकूर चिठ्ठीत लिहिलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुर्गा देवी ज्येष्ठ नागरिक संघात सक्रिय
मुरलीधर रामचंद्र जोशी व त्यांच्या पत्नी सेवानिवृत्त
शिक्षिका लता हे एकदंत अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर राहत होत्या. त्यांचा मुलगा संदीप जोशी हा पनवेल येथे प्राचार्य असून दुसरा मुलगा प्रसन्ना मुंबईला असून त्याचा लघुउद्योग आहे. श्री दुर्गादेवी जेष्ठ नागरिक संघात मुरलीधर जोशी हे सक्रिय होते. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यांनी मंदिरासाठी देणगीची पावतीही दोन दिवसांपूर्वी फाडली होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
साडेतीन वर्षांपासून आजाराशी लढा
सेवानिवृत्त शिक्षिका लता जोशी या गेल्या साडेतीन-चार वर्षांपासून आजारपणाशी लढा देत होत्या. त्या अंथरुणाला खिळून होत्या. त्यामुळे मुरलीधर जोशी यांनी त्यांच्या सेवेसह घरातील सर्व प्रकारची कामे करण्यासाठी एका संस्थेमार्फत सीमा राठोड नावाच्या विवाहितेला केअर टेकर म्हणून कामावर ठेवले होते. बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सर्व काम करत असताना मुरलीधर यांनी एक हजार रुपये राठोड यांना देऊन घरातील काही वस्तू आणण्यास व त्यांची स्वतःची कामे करून संध्याकाळी येण्यास सांगितले होते.