मी ठाम राहिलो, अन्यथा त्याच वेळी मुख्यमंत्री झालो असतो! छगन भुजबळ यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 11:15 IST2024-05-20T11:14:56+5:302024-05-20T11:15:12+5:30
तेव्हा पक्ष फुटला नाही, आताच का फुटला?, शरद पवारांवर साधला निशाणा

मी ठाम राहिलो, अन्यथा त्याच वेळी मुख्यमंत्री झालो असतो! छगन भुजबळ यांचा दावा
नाशिक : काँग्रेस फुटून त्यातून शरद पवार जेव्हा बाहेर पडले, त्यावेळी मी काँग्रेसमध्येच थांबावे यासाठी काँग्रेसच्या तत्कालीन अनेक दिग्गज नेत्यांनी मला फोन केला. आम्ही तुम्हाला पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करतो; पण तुम्ही जाऊ नका, असेही सांगितले होते. मात्र, मी त्यावेळी शरद पवार यांच्याबरोबरच राहणार असल्याचे सांगून त्यावर ठाम राहिलो होतो. अन्यथा, ९९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या अधिक सीट आल्याने मी त्याचवेळी मुख्यमंत्री झालो असतो, असा दावा अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.
हवे तर वासनिकांना विचारा...
त्यावेळी मी काँग्रेसमध्येच राहावे आणि तुम्ही दिल्लीत या, तुम्हाला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याचे फोन करणाऱ्यांमध्ये काँग्रेसमधील माधवराव शिंदे, शीला दीक्षित, राजेश पायलट, सुरेश कलमाडी, ऑस्कर फर्नांडिस यांच्यासारखे नेते होते. मुकुल वासनिक यांनादेखील तुम्ही याबाबत विचारू शकता, असेही भुजबळ यांनी नमूद केले.
...मग २००४ मध्ये मला उपमुख्यमंत्री का केले?
२००४ मध्ये मला मुख्यमंत्री केले असते, तर पक्ष फुटला असता हे शरद पवार यांचे मत का होते, हे त्यांनाच माहीत; पण त्यानंतरही २००४ मध्ये त्यांनी मला उपमुख्यमंत्री केले तरी पक्ष फुटला नव्हता; पण आता तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच पक्ष फुटला असे म्हणत भुजबळ यांनी शरद पवार यांना टोला लगावला.
२००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यायला काँग्रेसची तयारी होती. तेव्हा भुजबळ किंवा आर. आर. पाटील हे मुख्यमंत्री झाले असते. पण शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदच नाकारले, असे विधान अजित पवार यांनी केले होते. या विधानाला भुजबळ यांनीही पुष्टी दिली. शरद पवारांना त्यावेळी काय अडचण होती, याची कल्पना नाही, असेही भुजबळ म्हणाले.