नरेंद्र मोदींना मी सांगितलं, सगळ्या गोष्टी मान्य, पण...; शरद पवारांनी जाहीर सभेत सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 12:36 AM2024-03-14T00:36:38+5:302024-03-14T00:38:13+5:30
शरद पवार हे सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत जाहीर सभाही घेत आहेत.
Sharad Pawar Speech ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत जाहीर सभाही घेत आहेत. बुधवारी निफाडमध्ये घेतलेल्या सभेतून शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. तसंच मोदींच्या एका वक्तव्याची आठवण करून देत तेव्हा घडलेला किस्साही सांगितला.
नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना शरद पवार म्हणाले की, "मला आठवतंय, एकदा मोदी साहेबांनी मला सांगितलं की, ‘शरदराव आपके बारामती में मुझे आना है’ मी म्हटलं, ‘आप आ सकते है।’ तुमची शेती बघायची ते बोलत होते. आले; सर्व शेती पाहिली, कारखानदारी पाहिली, शैक्षणिक संस्था पाहिल्या आणि बाहेर जाऊन सांगितले, शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो. राजकारणात गॅरंटी द्यायची आणि पाळायची नाही आणि त्याच राजकारणात ते माझा बोट धरून आलेत. मी पार्लमेंटमध्ये सांगितलं, मोदी साहेब सगळ्या गोष्टी मान्य. पण, माझ्या बोटाला हात लावू नका. माझे बोट असे राजकारण करणारे नाही आणि गॅरंटी पाळणार नसाल, तर तुमची बदनामी होणार असेल की नाही याचा विचार तुम्ही करा. पण, माझ्यासारख्याची बदनामी करू नका," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
"सगळे सांगत आहेत, कसली गॅरंटी ? मोदीची गॅरंटी. काय गॅरंटी दिली ? आज या गॅरेंटी मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, याची गॅरंटी दिली. उत्पन्न वाढले नाही. आत्महत्या थांबल्या नाहीत. आत्महत्या वाढल्यात, त्याची गॅरंटी दिली होती. रोजगार वाढवणार, बेकारी घालवणार याची गॅरंटी दिली होती. त्यातली एकही गॅरंटी पूर्ण झाली नाही. फक्त आश्वासने देणे याशिवाय दुसरे काहीच करायचे नाही," असा हल्लाबोलही शरद पवार यांनी केला आहे.
"महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळातील मंत्री तुरुंगात टाकले"
केंद्र सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, "आज अनेक गोष्टी आहेत. सत्तेचा गैरवापर आहे. त्यांच्या मनासारखे राजकारण कोणी करत नाही म्हणून टोकाची भूमिका घेतली जाते. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचे मंत्री तुरुंगात टाकले. राऊत साहेबांनी आपल्या लेखणीने सरकारच्या चुकीच्या धोरणावर आवाज उठवला. त्यांना तुरुंगात टाकले. अनिल देशमुख यांना तुरुंगात टाकले. आज झारखंडचे मुख्यमंत्री त्यांच्या विचारांचे नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ८ नोटीसा टाकल्या. त्यांना देखील तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या मंत्रिमंडळातील ३ मंत्र्यांना तुरुंगात टाकले. जिथे तुमच्या मनाविरुद्ध वागतात. तुमची भूमिका स्वीकारत नाही. त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून तुरुंगात टाकण्याची कामगिरी आजचे हे सरकार करत आहे आणि त्यामुळे, यात बदल केला पाहिजे. आणि तो बदल करायचा असेल तर ती संधी मतदानाच्या निमित्ताने आपल्यासमोर आलेली आहे," असं म्हणत शरद पवार यांनी सरकारचा समाचार घेतला.