...तर राजकारणातून संन्यास घेईन, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य
By संकेत शुक्ला | Published: March 2, 2024 05:28 PM2024-03-02T17:28:08+5:302024-03-02T17:28:47+5:30
मोदी यांचे विचार सामान्य माणसाला पटतात, असं देखील ते म्हणाले.
संकेत शुक्ल, नाशिक : पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या कामांमुळे मोदी सरकार स्ट्राॅंग आहे. कलम ३७० हटवणे, भारताने चंद्रावर लावलेला झेंडा यासह मोदी यांनी केलेली कामे सामान्य माणसांनाही पटतात. त्यांचे म्हणणे पटत नाही, असे म्हणत जर सामान्य पुढे आले तर सक्रिय राजकारणातून संन्यास घेईन, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
भोसला महाविद्यालयाच्या कार्यक्रमासाठी नाशिक येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्रालयात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि आमदार थोरवे यांच्यात झालेल्या वादाबद्दल विचारले असता, त्याबद्दल माहिती नसल्याचे सांगत त्यावर प्रतिक्रिया देणे टाळले. शिखर बँकेचे प्रकरण अजूनही न्यायालयात आहे. ते संपलेले नाही. जो काही निर्णय व्हायचा तो न्यायालयात होईल. कोणत्याही प्रकारचा अहवाल द्यायला न्यायालय स्वायत्त असल्याने निर्णय आल्यानंतर पुढची प्रक्रिया होईल, असेही पाटील म्हणाले. भारतात परदेशी गुंतवणूक वाढत आहे. चीनमधून बाहेर पडलेल्या उद्योगांनी भारताला प्राधान्य दिल्याचेही त्यांनी सांगितले.
जागा वाटपासाठी भाजपमध्ये एक प्रक्रिया असते. त्यात निर्णय घेणाऱ्यांमध्ये मी नाही. कुणाचे तिकीट अंतिम झाले हे मला माहिती नाही. पहिल्या टप्प्यात केंद्रीय स्तरावरील नेत्यांचे स्थान असेल. १० तारखेच्या आत आम्हाला दौरे संपवायचे असल्याने त्यादृष्टीने देशभरात दौरे सुरू असल्याचे सांगत पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची तयारी सुरू असल्याचे संकेत दिले. याबरोबरच सर्वच ठिकाणी नेत्यांची जबाबदारी पक्की असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांना आलेल्या धमकीबद्दल विचारले असता, त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगत भुसे आणि थोरवे यांच्यात झालेल्या वादाबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला.