Eknath Shinde: आनंद दिघेंबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार; वेळ आल्यावर बोलणार- एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 17:20 IST2022-07-30T15:58:30+5:302022-07-30T17:20:51+5:30
एकनाथ शिंदे हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून आज मालेगावमध्ये आहेत.

Eknath Shinde: आनंद दिघेंबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार; वेळ आल्यावर बोलणार- एकनाथ शिंदे
मालेगाव/ मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे रोज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. तर, उद्धव ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटातूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तुम्ही आमचे आई-बाप का काढता?, सत्तेसाठी विश्वासघात कोणी केला?, असा सवाल उपस्थित करत मलाही आता भूकंप करावा लागेल, असा इशाराच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. वेळ आल्यानंतर त्यावर देखील भाष्य करणार असल्याचं सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून आज मालेगावमध्ये आहेत. यावेळी सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, अन्याय विरोधात पेटून उठा, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. मी आज काही बोलणार नाही. मात्र, समोरून जसे जसे तोंड उघडेल मग मलाही बोलावं लागेल, असा इशारा एकनाथ शिंदेंनी यावेळी दिला.
दरम्यान, एकनाथ शिंदेंकडून नुकसानग्रस्त भागाची देखील पाहणी करण्यात येत आहे. जनावरांचा मृत्यू झाला असेल, घर आणि गोठ्यांचे नुकसान झाले असेल त्यांना नुकसान भरपाई तातडीने देण्यात येईल. असे सांगुन शिंदे म्हणाले, वनहक्क पट्टे प्रकरणे युद्ध पातळीवर निकालात काढण्याची आवश्यकता आहे. ३६ लाख रकूल आणि पारंपारिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता कृषी विद्यापिठांना बळकटी दे्ण्याची गरज आहे.शेतकऱ्यांना सिविध देशातील आणि इतर राज्यांतील शेतकऱ्यांची शेती पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. क्लस्टर आणि सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे क्लस्टर शेतीला राज्य शासन प्राधान्य देईल असेही शिंदे म्हणाले.
मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कॅम्प पोलीस ठाणे व २०५ पोलीस निवासस्थाने यांच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते झाला. कायदा-सुव्यवस्थेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात येईल - मुख्यमंत्री pic.twitter.com/Gn7PRMjEJT
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 30, 2022
एकनाथ शिंदेंनीही राज्यपालांचे टोचले कान-
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं विधान वैयक्तिक आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना म्हणून राज्यपालांच्या मताशी सहमत नाही. मराठी लोकांचं मुंबईसाठी मोठं योगदान आहे. त्यामुळे मराठी माणसांचं योगदान कोणालाही नाकारता येणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राज्यपाल म्हणजे एक प्रमुख पद असतं. त्यामुळे कोणाचाही अपमान होणार नाही, याची बोलताना काळजी त्यांनी घेतली पाहिजे. मराठी माणसामुळेच मुंबईला वैभव आहे. मराठी माणसांचं योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. इतर राज्यातील, समाजातील लोक व्यवसायच करतात. मात्र मुंबईचं श्रेय कोणालाही घेता येणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.