आयसीआयसीआय इन्शुरन्सला ग्राहक न्यायालयाचा दणका!
By admin | Published: July 10, 2017 01:30 AM2017-07-10T01:30:11+5:302017-07-10T01:30:24+5:30
नाशिक : विमा नाकारणाऱ्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने दणका दिला
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विमा काढलेल्या वाहनाच्या अपघातानंतर कोणतेही सुयोग्य कारण न देता विमा नाकारणाऱ्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने चांगलाच दणका दिला असून, ग्राहकाला न्याय मिळाला आहे़ कंपनीने तक्रारदाराला विम्याच्या रकमेचे ३ लाख ७६ हजार रुपये तसेच मानसिक त्रासापोटी ७ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी तीन हजार असा दहा हजारांचा दंडही केला आहे़
लासलगाव येथील रहिवासी हरपालसिंग भल्ला यांच्या मालकीची टोयोटा इटियॉस कार असून, त्यांनी वर्षभराचा कारचा विमा काढला होता़ यानंतर अकरा महिन्यांनी या कारचा इगतपुरीजवळ अपघात झाल्याने त्यांनी तत्काळ विमा कंपनीला माहिती दिली़ त्यानुसार कंपनीचा सर्वेअर आला व त्याने ३ लाख ७७ हजार रुपयांचे नुकसान दाखवत अंतिम बॉण्डही लिहून घेतला़ मात्र यानंतर कंपनीने विम्याची रक्कम न देता दावा नामंजूर केल्याचे पत्र भल्ला यांना पाठविले असून, यासाठी कोणतेही कारण दिले नाही़
तक्रारदार भल्ला यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी ७ हजार रुपये व तक्रारीच्या खर्चासाठी ३ हजार असा दहा हजार रुपयांचा दंडही न्याय मंचचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे व सदस्य प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी यांनी दिला़ तक्रारदार भल्ला यांच्यामार्फत अॅड़ टी़ एस़ थेटे यांनी काम पाहिले़