आयसीएसईचे विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रथम फेरीला मूकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 06:26 PM2019-07-18T18:26:33+5:302019-07-18T18:30:26+5:30
अकरावी प्रवेशप्रक्रियेतील गोंधळ दूर करण्यासाठी शासनाने केंद्रीय आॅनलाइन पद्धती आणली. मात्र शिक्षण क्षेत्रातील शासनाच्या धरसोडीच्या धोरणामुळे या प्रवेशप्रक्रियेतही गोंधळ निर्माण झाला आहे. यावर्षी शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणच कपात केल्यामुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरली. त्यामुळे अकरावी प्रवेशसाठी शासनाने आयसीएसई, सीबीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळांच मूल्यांकनाविषयी नवीन अटी-शर्ती लागू केल्याने अकरावी प्रवेशात यावर्षी नवीन गोंधळ निर्माण होऊन आयसीएससी बोर्डाचे अनेक विद्यार्थी अकरावी प्रवेशच्या प्रथम फेरीला मुकले आहे.
नाशिक : शासनाने अकरावी प्रवेशप्रक्रियेतील गोंधळ दूर करण्यासाठी केंद्रीय आॅनलाइन पद्धती आणली. मात्र शिक्षण क्षेत्रातील शासनाच्या धरसोडीच्या धोरणामुळे या प्रवेशप्रक्रियेतही गोंधळ निर्माण झाला आहे. यावर्षी शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणच कपात केल्यामुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरली. त्यामुळे अकरावी प्रवेशसाठी शासनाने आयसीएसई, सीबीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळांच मूल्यांकनाविषयी नवीन अटी-शर्ती लागू केल्याने अकरावी प्रवेशात यावर्षी नवीन गोंधळ निर्माण होऊन आयसीएससी बोर्डाचे अनेक विद्यार्थी अकरावी प्रवेशच्या प्रथम फेरीला मुकले आहे.
आयसीएसई व सीबीएसईच्या तुलनेच महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाकडून शिक्षण घेणारे आणि परीक्षा देणारे विद्यार्थी मागे पडतात, ही नेहमीची ओरड आहे. हा गोंधळ थांबविण्यासाठी कधी अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांची खैरात देण्याचा, तर कधी हे मूल्यांकन थांबविण्याचा निर्णय तुघलकी पद्धतीने घेतला जातो. या दोहोंमुळे अकरावी प्रवेशप्रक्रियेतला गोंधळ कमी होत नसून वाढतानाच दिसून येत आहे. दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण व गुणांची टक्केवारी मागच्या वर्षाच्या तुलनेत कमी असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अकरावीच्या गुणाधिष्ठित प्रवेशप्रक्रियेमध्ये केंद्रीय परीक्षा मंडळाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारण्याचे संकेत दिसताच शासनाने आयसीएसई व सीबीएसईच्या मूल्यांकनासाठीही अंतर्गत गुण वगळण्याचा निर्णय घेतला. परंतु, या निर्णयाला विरोध झाल्याने सर्वोत्तम पाच विषयांचा पर्याय समोर आला. मात्र त्यातही आयसीएसईचा संगणक विषय वगळण्याचा निर्णय झाल्याने पहिल्या पाचच विषयांचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय झाला. मात्र या गोंधळात विद्यार्थी आणि पालकही संभ्रमात पडल्याने त्यांना वेळोवेळी अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश अर्जात बदल करावा लागला. मात्र या संभ्रमात अनेक विद्यार्थ्यांनी शेवटच्या टप्प्यात उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आॅनलाइन अर्जात बदलच केला नसल्याने अशा विद्यार्थ्यांची प्रथम प्रवेश फेरीत निवडच झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रथम फेरीत प्रवेशाची संधी चुकलेल्या पालकांनी दुसºया फेरीतील प्रक्रियेत शासनाकडून सुधारणा करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दुसऱ्या फेरीची करावी लागणार प्रतीक्षा
पहिल्या फेरीत वारंवार आॅनलाइन अर्जात फेरबदल करूनही आयसीएसईच्या अनेक विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशप्र्रक्रियेच्या प्रथम फेरीत प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे अशा पालकांना दुसऱ्या फेरीची प्रतीक्षा असून, त्यांना १७ व १८ जुलै या दोन दिवसांत आॅनलाइन अर्जात बदल करण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर २२ जुलैला दुसरी गुणवत्ता यादी प्रदर्शित झाल्यानंतरच या विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळणार की नाही ते स्पष्ट होऊ शकणार आहे.