पक्षांपेक्षा वेगळ्या समीकरणांचा अंदाज
By Admin | Published: February 16, 2017 12:27 AM2017-02-16T00:27:02+5:302017-02-16T00:27:12+5:30
नांदगाव : वेगवेगळ्या आधारांवर विजयाची आकडेमोड
संजीव धामणे नांदगाव
माघारीनंतर गट व गणात पक्ष पातळीवर तिरंगी लढती दिसून येत असल्या तरी काही ठिकाणी पक्ष पातळीपलीकडे जाऊन जातीची समीकरणे जोर धरु लागल्याने निकालोत्तर बलाबल कशाच्या आधारावर असेल, याची चिकित्सा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
पक्षातला निष्ठावान केवळ चादरी उचलण्यासाठीच असतो, जिंकण्याचे मेरिट त्याच्यात नसतेच. या समजामुळे आयात झालेले उमेदवार तिकीट मिळविण्यात यशस्वी होत असतात. इतरत्र आढळणारा हा प्रकार येथेही आहेच.
शिवसेनेकडे यावेळी इतर पक्षांमधून आयात झालेल्या उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. भाजपाही त्याला अपवाद नाही. साकोरा गटात बाजार समितीमधील शिवसेनेचे विद्यमान संचालक दिलीप पगार भाजपाच्या तिकिटावर नशीब आजमावत आहेत. परवापर्यंत राष्ट्रवादीत असलेले भुजबळांचे निकटवर्ती विष्णू निकम यांच्या पत्नी सुमन निकम साकोरा गणात शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या आहेत.
याच गणात भाजपाने पूर्वाश्रमीचे शिवसैनिक दीपक म्हस्के यांच्या पत्नी ज्योती म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे. तर न्यायडोंगरी गणातील शिवसेना पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे यांना काँग्रेसमधून आलेल्या विजया अहेर यांनी तिकिटाची धोबीपछाड दिल्याने मोरे यांनी पत्नी गायत्री मोरे यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवून आहेरांना शह दिला आहे.
एकंदरित या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी या दोघा पक्षांची पडझड झाली. काँग्रेस व राष्ट्रवादीतून निर्यात झालेल्या इच्छुकांमुळे शिवसेना व भाजपा या पक्षांमध्ये गर्दी झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. पानेवाडी गणात धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे गंगाधर बिडगर शिवसेनेच्या तिकिटावर उभे आहेत. शिवसेनेचे दशरथ लहिरे यांच्या पत्नी प्रतिभा लहिरे यांना तिकीट मिळविण्यात यश मिळाले.
राष्ट्रवादीच्या साकोरा गटातील विद्यमान सदस्य माधुरी बोरसे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीविरोधात बंडाचे निशाण फडकावत साकोरे गणातून अपक्ष उमेदवारी केली आहे. साकोरा, मांडवड, न्यायडोंगरी, जातेगाव या मोठ्या गावांमधून निवडणुकीत गावाचा अभिमान हा मुद्दा आहे. एकंदरित पक्षांनी गट व गणांत उमेदवार देताना जातीय समीकरणे समोर ठेवून उमेदवार दिले असले व त्यामधून पक्षीय यशाची स्वप्ने बघितली असली तरी अंतर्गत प्रवाह वेगळ्या दिशेने वाहू लागले आहेत. माधुरी बोरसे यांची अपक्ष उमेदवारी या प्रवाहांचे एक मासलेवाईक उदाहरण आहे. पक्षीय गणितांवर जातीय समीकरणांनी मात केली तर अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता आहे.