आदिवासींना नर्सरीपासून शिक्षण देण्याचा विचार: के. सी. पाडवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 01:02 AM2021-03-13T01:02:43+5:302021-03-13T01:03:19+5:30
राज्यातील प्रत्येक विद्यापीठात आदिवासी मुलांच्या वसतिगृहासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिली असून, भविष्यात आदिवासी विद्यार्थ्यांना नर्सरीपासून शिक्षण सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांनी केले.
नाशिक : राज्यातील प्रत्येक विद्यापीठात आदिवासी मुलांच्या वसतिगृहासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिली असून, भविष्यात आदिवासी विद्यार्थ्यांना नर्सरीपासून शिक्षण सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांनी केले.
आदिवासी विकास विभागाच्या पेठ रोडवरील वसतिगृह परिसरात मुलींसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन ॲड. पाडवी यांच्या हस्ते कोनशिला अनावरणाने करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आदिवासी वसतिगृहांसाठी जागा व निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, आगामी कालावधीत मुलांना नर्सरीपासून शिक्षण कसे देता येईल तसेच विद्यार्थी शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही, यावर ठोस उपाययोजना करण्याबाबत विचार सुरू असून, त्याबाबत सर्व शक्यतांची पडताळणी केली जात आहे. यावेळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त डाॅ. हिरालाल सोनवणे, अपर आयुक्त गिरीश सरोदे, विकास पानसरे, सहायक जिल्हाधिकारी वर्षा मीना उपस्थित होते.
नवीन वसतिगृहाची वैशिष्ट्ये
नाशिक शहरात आदिवासी मुलांसाठी १६०५ व मुलींसाठी ६२५ क्षमतेचे वसतिगृह मंजूर आहे. भूमिपूजन होत असलेल्या इमारतीची क्षमता ३१० आहे. तळ मजल्यासह सात मजली इमारत पार्किंग, गरम पाण्यासाठी सोलर सिस्टीम, स्वतंत्र अभ्यासिका, स्वतंत्र भोजनालयाची व्यवस्था, अधीक्षकांसाठी निवासाची सोय, प्रत्येक मजल्यावर पिण्याच्या पाण्यासाठी दोन वॉटर कूलर असतील.