सामाजिक न्यायातच समतेचा विचार : नरेश गिते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:48 AM2019-07-01T00:48:26+5:302019-07-01T00:48:59+5:30
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी जातीभेद निर्मूलन व सामाजिक आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवून सामाजिक समतेचा विचार मांडला. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा असेल तर वंचितांना प्रवाहात आणून त्यांच्यासाठी समता प्रस्थापित केली पाहिजे,
नाशिक : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी जातीभेद निर्मूलन व सामाजिक आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवून सामाजिक समतेचा विचार मांडला. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा असेल तर वंचितांना प्रवाहात आणून त्यांच्यासाठी समता प्रस्थापित केली पाहिजे, असा विचार शाहू महाराजांनी मांडला, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले.
समाज कल्याण विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त सामाजिक न्याय दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नरेश गिते होते. यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, सहायक आयुक्त श्रीमती प्राची वाजे, नगरसेवक प्रशांत दिवे, शाहू विचारांचे अभ्यासक प्राध्यापक गंगाधर आहिरे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख, सहायक संचालक दीपक बिरारी व प्राध्यापक घनश्याम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गिते यावेळी म्हणाले, सामाजिक समतेचे पहिले पाऊल राजर्षी शाहू महाराज यांनी उचलले. हे विचार आज समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोविचण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचीदेखील युवकांनी कास धरली पाहिजे. सोशल मीडियाचा जपून वापर करणे तरुणांचे कर्तव्य असल्याचेही गिते म्हणाले. यावेळी प्रा. गंगाधर आहिरे यांचे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन व कार्य’ या विषयावर व्याख्यान झाले. भगवान वीर यांनीही यावेळी विचार मांडले.
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदान
यावेळी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविलेल्या जाणाऱ्या राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, शासकीय निवासी शाळेत इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्र मांक प्राप्त विद्यार्थी, गटई स्टॉल, अनुसूचित जाती बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेतील अनुक्र मे प्रशांत गावले, ऋतुजा भुजबळ, खुशाल ठाकरे, रूपेश तुपे, जिभाऊ डोंगरे, आकाश डोंगरे, सुभाष डावरे, प्रशिक महिला स्वयंसहाय्यता बचतगट, गौतमी महिला स्वयंसहाय्यता बचतगट, आरती भांगे, महेश लोणके या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.