आदर्श मतदान केंद्रे उभारणार
By admin | Published: April 23, 2017 01:08 AM2017-04-23T01:08:55+5:302017-04-23T01:09:09+5:30
मालेगाव : येथील महापालिकेची निवडणूक पारदर्शक होण्यासाठी यंत्रणेने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालेगाव : येथील महापालिकेची निवडणूक पारदर्शक होण्यासाठी यंत्रणेने पूर्ण तयारी केली आहे. निवडणूक काळातील प्रचार सभा, जाहिराती व इतर कामांच्या परवानग्यांसाठी स्वतंत्र खिडकी सुरू करण्यात येणार आहे. तसेच आचारसंहिता कक्ष कार्यान्वित केला जाणार आहे. आर्थिक घोडेबाजार रोखण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. शहरात हे पथक कार्यरत राहणार असल्याची माहिती मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालेगाव महापालिकेची येत्या २४ मे रोजी सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती आयुक्त जगताप यांनी पत्रकारांना दिली.
जगताप पुढे म्हणाले की, येत्या सोमवारी दुपारी ४ वाजता शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती दिली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ठिकाणे निश्चित करण्यात येणार आहेत.
गरजू मतदारांना रुग्णवाहिका व शासकीय वाहन मतदानासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. मतदान केंद्रनिहाय यादी येत्या सोमवारी (दि. २४) प्रसिद्ध केली जाणार आहे.
निवडणूक काळात होणाऱ्या सभा व प्रचाराच्या वाहनांसाठी लागणाऱ्या परवानग्या व इतर कामांसाठी संकीर्ण कर विभागात स्वतंत्र खिडकी सुरू केली जाणार आहे. निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन म्हणून पैसे वाटप करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. यासाठी आयकर विभागाचे अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. स्वतंत्र पथके तैनात केली जाणार आहेत. (प्रतिनिधी)