शाळा सुरू करण्याचा धोका ओळखा ; मुख्याध्यापक संघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 08:51 PM2020-06-22T20:51:36+5:302020-06-22T21:01:16+5:30
नाशिक आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यातील धोका ओळखून शिक्षण विभागाने जुलैपासून शाळा सुरू करण्याचे आणि त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक सभा बोलावण्याचे काढलेले आदेश तत्काळ मागे घ्यावे, असे आवाहन मुख्याध्यापक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केले आहे.
नाशिक : जागतिक आरोग्य संघटनेनेच्या अहवालानुसार कोरोना व्हायरसची दुसरी मोठी लाट जगभर सुरू झाली असून, अशा स्थितीत नाशिक आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यातील धोका ओळखून शिक्षण विभागाने जुलैपासून शाळा सुरू करण्याचे आणि त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक सभा बोलावण्याचे काढलेले आदेश तत्काळ मागे घ्यावे, असे आवाहन मुख्याध्यापक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केले आहे.
शाळा सुरू करायच्या किंवा कसे, याबद्दलचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर टाकणे अत्यंत गैर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे किंवा कसे, हे सांगण्याचा अधिकार महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासनाचा आहे. ती जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर टाकणे धोकादायक ठरू शकेल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले असून प्रथम नाशिक आणि महाराष्ट्र कोरोना संकटातून मुक्तझाल्याचे शासनाने आधी जाहीर करावे आणि मगच शाळा, कॉलेज फिजिकली सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा. तोपर्यंत शिक्षणात खंड पडू नये यासाठी आॅनलाइन, टीव्ही, वर्कबुक, अॅक्टिव्हिटी बुक, प्री लोडेड टॅब अशा सगळ्या पयार्यांचा विचार करण्याची गरज असल्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी केलेल्या आहे. परंतु, बंगळुरूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ एंड न्यूरो-साइंसेज संस्थेने मोबाइल किंवा ऑनलाइन शिक्षण देणे हे मुलांच्या आरोग्यास घातक असल्याचे स्पष्ट केल्याचा दाखला देत खासगी शाळांनी सुरू केलेल्या ऑनलाइन शिक्षणाच्या माऱ्यालाही तत्काळ वेसण घालण्याचे आवाहनही मुख्याध्यापक संघाने यापत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केले आहे.