भुजबळांना काही झाले तर सरकार जबाबदार;शरद पवार यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 05:08 PM2018-03-10T17:08:14+5:302018-03-10T17:08:14+5:30
गेल्या काही दिवसांपासून मला छगन भुजबळ यांच्या खालावत जाणा-या तब्बेतीविषयी चिंताजनक माहिती भेटत आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी ते कारागृहात खितपत पडले आहेत. छगन भुजबळ यांच्या प्रकरणात ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या विषयी अजुन माननीय न्यायालयाकडून काही निर्णय झालेला नाही.
नाशिक : राष्टÑवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार करण्याची मागणी विधीमंडळ अधिवेशनात करण्यात आल्यानंतर आता पक्षाचे नेते शरद पवार यांनीही भुजबळ यांच्या प्रकृती विषयी चिंता व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले असून, भुजबळ यांच्यावर योग्य उपचार व्हावेत अन्यथा काही अप्रिय घडले तर सरकारलाच जबाबदार धरण्यात येईल असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे.
या संदर्भातील पत्रात पवार यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून मला छगन भुजबळ यांच्या खालावत जाणा-या तब्बेतीविषयी चिंताजनक माहिती भेटत आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी ते कारागृहात खितपत पडले आहेत. छगन भुजबळ यांच्या प्रकरणात ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या विषयी अजुन माननीय न्यायालयाकडून काही निर्णय झालेला नाही. न्यायालयाकडून त्यांच्या बाबतीत अंतीम निर्णय येत नाही तो पर्यंत त्यांना निर्दोष समजण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा असे म्हटले आहे की, ‘जामीन हा नियम आहे आणि तुरूंग हा अपवाद आहे’ हे तत्व छगन भुजबळ यानाही लागू होते. त्यांना वारंवार नाकारण्यात येत असलेला जामीन दुर्देवी आहे. मला त्यावर काहीही वक्तव्य करायचे नाही. छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. त्यांनी पन्नासहून अधिक वर्षे सामाजिक जीवनात घातली आहेत. त्यांनी मुंबईचे महापौर, महाराष्टÑाचे उपमुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम अशी पदे भुषविली आहेत. त्यांनी महाराष्टÑाच्या जनतेच्या कल्याणासाठी दिलेले योगदान अव्हेरता येणार नाही. मला जास्त काही अपेक्षा नाही पण योग्य ते वैद्यकीय उपचार त्यांना दिले गेले पाहिजेत, तो त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. त्यांच्या प्रकृती विषयी आणि वाढत्या वयाविषयी तुम्ही ज्ञात आहात. मला खात्री आहे की तुम्ही त्यांना योग्य वैद्यकीय उपचार भेटावेत यादृष्टीने पावले उचलाल. मला हे खेदाने म्हणावे लागत आहे की, येत्या काळात जर छगन भुजबळ यांना एखाद्या अप्रिय परिस्थितीतून जावे लागले तर तुमच्या सरकारला यासाठी जबाबदार धरले जाईल.
शरद पवार यांनी गुरूवारी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेले हे पत्र शनिवारी सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले. विशेष म्हणजे त्याच दिवशी नाशिक येथे राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोपानिमित्त शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.