बाळासाहेब असते तर अमित शहा पटक देंगे म्हणू शकले नसते..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:38 AM2019-02-11T00:38:37+5:302019-02-11T00:39:04+5:30
शिवसेनेचा तो काळ वेगळा होता. शिवसेनाप्रमुख आज असते तर भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा वगैरेंसारखे जे लोक आहेत ते पटक देंगे वगैरे म्हणू शकले नसते, असे मत राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नाशिकमध्ये ठाकरे चित्रपट बघून शिवसेनेतील आठवणींना उजाळा देताना ते पत्रकारांशी बोलत होते.
नाशिक : शिवसेनेचा तो काळ वेगळा होता. शिवसेनाप्रमुख आज असते तर भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा वगैरेंसारखे जे लोक आहेत ते पटक देंगे वगैरे म्हणू शकले नसते, असे मत राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नाशिकमध्ये ठाकरे चित्रपट बघून शिवसेनेतील आठवणींना उजाळा देताना ते पत्रकारांशी बोलत होते.
ऐन सार्वत्रिक निवडणुकीचा काळ, त्यामुळे राजकीय वातावरण तप्त असतानाच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या चित्रपटगृहात ठाकरे चित्रपटाचा खेळ घेऊन चर्चेला उधाण आणले. स्वत: भुजबळ यांनी चित्रपट बघितला आणि भूतकाळ जागविला. शिवसेनेची त्यावेळी असलेली आक्रमकता आणि आताची स्थिती या विषयावर पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी ते दिवस वेगळे होते, ती माणसे वेगळी होती. बाळासाहेब ठाकरेंच्या त्या काळात अमित शहा वगैरेंसारखे पटक देंगे म्हणू शकले नसते, असे त्यांनी सांगितले; परंतु त्याचबरोबर त्यांनी सध्या शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. भुजबळ यांनी शिवसेना तळागाळात असल्याने ती संपणे शक्य नसल्याचे सांगितले. या चित्रपटाच्या निमित्ताने ज्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी माहिती नाही किंवा प्रत्यक्ष बघितलेले नाही, अशा अनेक घटनांना उजाळा मिळाल्याचे भुजबळ यांनी सांगितले. या चित्रपटात नारायण राणे किंवा स्वत: भुजबळ यांच्या विषयीचा उल्लेख नसल्याचे विचारल्यानंतर चित्रपट ठाकरेंवर आहे, भुजबळ किंवा राणेंवर नाही. बाळासाहेबांचे जीवन चरित्रच इतके मोठे आहे की, त्यात एक चित्रपट नाही तर असे सात-आठ चित्रपट काढावे लागतील, असेही भुजबळ म्हणाले.
यावेळी समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, कोंडाजीमामा आव्हाड, अॅड. रवींद्र पगार, रंजन ठाकरे, गजानन शेलार, शाहू खैरे, विश्वास ठाकूर यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली.
पंतप्रधानपदासाठी पवारांना सेनेचा पाठिंबा शक्य
शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिल्याचे चित्रपटात नमूद असून, त्याबाबत विचारणा केल्यानंतर भुजबळ म्हणाले की, शिवसेनेने नेहमीच पाठिंबा देऊन मराठी माणसाच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे. आमचे खासदार कमी असल्याने पंतप्रधान होणे शक्य नसल्याचे स्वत: शरद पवार यांनीच सांगितले आहे. परंतु कर्मधर्मसंयोगाने तशी वेळ आलीच तर शिवसेना पाठिंबा देईल, असेही ते म्हणाले.