व्यवसायाला धर्मापेक्षाही मोठे मानले तर यश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:17 AM2020-01-12T00:17:54+5:302020-01-12T01:34:14+5:30

आपला उद्योग आणि उत्पादनाच्या ब्रॅन्डला ख्याती मिळवून द्यायची तर त्या ध्यासाने परिश्रम आवश्यक असतात. केवळ जिद्दीनेच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक इरेला पेटून व्यवसाय केला आणि व्यवसायाला धर्मापेक्षाही मोठे मानले तर यश निश्चित मिळते, असा यशाचा मंत्र मसालाकिंग धनंजय दातार यांनी ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल (बीबीएनजी) या संस्थेच्या पाचव्या परिषदेत बोलतांना दिला.

If business is considered to be greater than religion, success will be assured | व्यवसायाला धर्मापेक्षाही मोठे मानले तर यश निश्चित

बीबीएनजीच्या कौस्तुभ पुरस्कार वितरणाप्रसंगी मसालाकिंग धनंजय दातार, वंदना दातार, महापौर सतीश कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, विराज लोमटे, मुकुंद कुलकर्णी, अभिजित चांदे आदी मान्यवरांसमवेत पुरस्कारार्थी राजेश व्यास, डॉ. सुहास नांदुर्डीकर, राम भोगले, गिरीश टिळक, शरद पोंक्षे.

Next
ठळक मुद्देमसालाकिंग धनंजय दातार । ‘बीबीएनजी’च्या कौस्तुभ पुरस्कारांचे वितरण

नाशिक : आपला उद्योग आणि उत्पादनाच्या ब्रॅन्डला ख्याती मिळवून द्यायची तर त्या ध्यासाने परिश्रम आवश्यक असतात. केवळ जिद्दीनेच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक इरेला पेटून व्यवसाय केला आणि व्यवसायाला धर्मापेक्षाही मोठे मानले तर यश निश्चित मिळते, असा यशाचा मंत्र मसालाकिंग धनंजय दातार यांनी ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल (बीबीएनजी) या संस्थेच्या पाचव्या परिषदेत बोलतांना दिला.
गोविंदनगरमधील मनोहर गार्डन येथे झालेल्या या परिषदेत राज्याच्या विविध भागांसह अन्य राज्यांतील ब्राह्मण उद्योजक, व्यावसायिक सहभागी झाले होते. यावेळी दातार यांच्या हस्ते प्रख्यात उद्योजक राम भोगले(औरंगाबाद) यांना जीवनगौरव तर गिरीश टिळक, राजेश व्यास, डॉ. सुहास नांदुर्डीकर आणि शरद पोंक्षे यांना उद्योग कौस्तुभ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दातार यांनी यावेळी बोलताना उद्योग कसा करावा, हे सांगण्यापेक्षा मी उद्योग कसा केला, कसा वाढवला त्याचे स्वानुभव कथन केले. आपण एका दुकानदाराचे बघून व्यवसायातून दररोज विशिष्ट रक्कम बाजूला काढू लागल्याने मोठी रक्कम जमा होऊ लागली. कमी व्याजदाराने काही कर्ज घेतले. त्यातून मग अन्य शहरांमध्ये अजून दुकाने सुरू केली. तरुणाईचा कल बघून धंद्याच्या स्वरूपात बदल करीत सर्वत्र चकाचक स्वरूप आणले. तसेच ग्राहकाशी सदैव नम्रतेने वागलो. त्यामुळेच अरब देशात
गेलेला एक सामान्य घरातील मुलगा अरबपती झाला व फोर्ब्जच्या यादीत जगातील श्रीमंतांमध्ये चौदाव्या स्थानी झळकू लागल्याचे दातार यांनी नमूद
केले.
पुरस्कारार्थींच्या वतीने शरद पोंक्षे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर महापौर सतीश कुलकर्णी, वंदना दातार, बीबीएनजीचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, सचिव विराज लोमटे, मुकुंद कुलकर्णी, अभिजित चांदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबईत दारोदार फिरून माल विकला
मुंबईत आणि विशेषत: ठाण्यात दारोदार फिरून आपण इन्स्टंट मिक्स व फिनाईल विकायचो. काही लोक चौकशा खूप करायचे आणि घ्यायचे मात्र काही नाही. दिवसभर शेकडो जिने चढ-उतार करून दिवसाला कशाबशा फिनेलच्या १५-२० बाटल्या विकल्या जायच्या. पण त्या सगळ्या अनुभवांमधून खूप शिकायला मिळाले. अपयशने खचून न जाता परिश्रम करीत राहण्याचा धडा यातून मिळाला, असे दातार यांनी सांगितले़

आईकडून मिळाले सर्वात मोठे बक्षीस
दुबईत गेल्यावर लादी पुसण्यापासून ओझी वाहण्यापर्यंतची कामे केली. छोटासा व्यवसाय सुरू केल्यानंतर तेथील क्रेडीटच्या पद्धतीमुळे व्यवसायात पूर्ण तोटा झाला. आईला कळवल्यावर आईने मंगळसूत्रासह दागिने विकून उद्योगासाठी पैसे दिले. भविष्यात व्यवसाय यशस्वी केल्यानंतर आईला दागिने परत केले, तेव्हा आईने मायेने तोंडावरून फिरवलेला हात हे माझ्यासाठी सर्वात मोठे बक्षीस होते, असे दातार यांनी सभागृहात सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

Web Title: If business is considered to be greater than religion, success will be assured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.