"धाकटे बंधू गोपीनाथ मुंडे हयात असते, तर जेलमध्ये गेलो नसतो!"
By अमोल यादव | Published: March 18, 2023 06:49 PM2023-03-18T18:49:02+5:302023-03-18T18:52:50+5:30
आयुष्यभर जनतेवर निरपेक्ष प्रेम करणारे मुंडे साहेब हयात असते, तर मी अडीच वर्ष जेलमध्ये गेलोच नसतो. ते पहाडाप्रमाणे माझा पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असते, अशा भावना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.
नाशिक : लोकनेते गोपीनाथ मुंडे हे माझे धाकटे बंधू होते. त्यांचा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचा राजकीय प्रवास अभिमानस्पद होता. ओबीसी चळवळीत ते मला मोठा बंधू मानत. आयुष्यभर जनतेवर निरपेक्ष प्रेम करणारे मुंडे साहेब हयात असते, तर मी अडीच वर्ष जेलमध्ये गेलोच नसतो. ते पहाडाप्रमाणे माझा पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असते, अशा भावना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.
नांदूर शिंगोटे (ता. सिन्नर) येथे साकारण्यात आलेल्या गोपीनाथ गडाचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि. १८) पार पडला. याप्रसंगी भुजबळ बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, स्व. मुंडे यांनी राज्यातील ओबीसींसह पीडित सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आयुष्यभर लढा दिला. त्याच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. त्यामुळे शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांचे काम सुरू ठेऊ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलतांना भुजबळ, स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी राज्यात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपले आयुष्य खर्च केले. माजी खासदार समीर भुजबळ यांचे वडील व माझे मोठे भाऊ मगन भुजबळ यांचे दुःखद निधन झाले तेव्हा मला अतिव दुःख झाले होते. धाकटे बंंधू गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाने देखील तितकेच दुख: झाले, अशा भावना भुजबळ यांनी व्यक्त केल्या.
भारतीय जनता पक्ष घराघरात पोहचवण्यासाठी मुंडे व प्रमोद महाजन यांनी संघर्ष केला. राज्यात ‘माधव’चा प्रयोग यशस्वी करण्यातही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
ओबीसी चळवळीसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. खासदार समीर भुजबळ यांनी संसदेत ओबीसी जनगणनेचा प्रस्ताव पुढे ठेवला, तेव्हा आपल्या पक्षाच्या भूमिकेचा विचार लक्षात न करता ओबीसी बांधवांची गणना का होत नाही? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला होता. आज ते असते तर जनजणनेचा प्रश्न नक्कीच मार्गी लागला असता, असा विश्वास देखील भुजबळ यांनी व्यक्त केला.
ओबीसींसह, गरजू, वंचितांना न्याय देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पुर्ण करावे. हीच मुंडे यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, असे भुजबळ यांनी सांगीतले. तसेच पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवत असून ही अभिमानास्पद बाब असे सांगत अखेरच्या क्षणापर्यंत मुंडे यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी काम करण्याचे आश्वासन भुजबळ यांनी दिले.