सरकार कुणाचेही येवो, सामान्यांचा काय फायदा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 01:15 AM2019-10-03T01:15:33+5:302019-10-03T01:16:00+5:30
नाशिक : विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. उमेदवारांचे मोर्चे आता ज्येष्ठ नागरिकांकडे वळाले आहेत. लोकप्रतिनिधी ज्येष्ठांना गाठत त्यांच्या पाया पडत आम्हालाच मत द्या, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर उमेदवारांविषयी वेगळ्याच चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे.
वेळ : सायंकाळी ५ वाजता
स्थळ : निरामय ज्येष्ठ नागरिक संघ
नाशिक : विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. उमेदवारांचे मोर्चे आता ज्येष्ठ नागरिकांकडे वळाले आहेत. लोकप्रतिनिधी ज्येष्ठांना गाठत त्यांच्या पाया पडत आम्हालाच मत द्या, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर उमेदवारांविषयी वेगळ्याच चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे.
निवडणूक आली की तेव्हाच लोकप्रतिनिधी बघायला मिळतात, मात्र निवडून आल्यानंतर पुढील पाच वर्षं त्यांचा चेहरा बघायला मिळत नसल्याचे निरामय ज्येष्ठ नागरिक संघातील एकाने सांगितले. त्यावर एकाने राजकारणी हे उत्कृष्ट कलाकार असतात, निवडणूक आली की ज्याला ओळखत नाही अशा लोकांच्या पाया पडतात. मात्र, त्यांना हे पण माहीत नसते की तो मतदार त्यांच्या मतदारसंघातील नाही. त्यावर एकाने सगळे राजकारणी एकच माळीचे मणी असल्याचे सांगत नगरसेवक, आमदार, खासदारांसह मुख्यमंत्र्यांनाही यात ओढले. तसेच सरकार कोणतेही आले तरी सामान्यांना कुठलाही फायदा होत नसल्याचे एकाने सांगितले, तर एकाने मी अनेक निवडणुका बघितल्या असून, उमेदवार हे फक्त त्यांचे पोट भरण्यातच समाधानी असतात. तर एकाने त्यांच्या भागातील समस्यांचा पाढा वाचत संताप व्यक्त केला. त्यावर सगळ्यांनीच त्यांच्या त्यांच्या भागातील समस्या सांगितल्या. चालायला रस्ते नाही, बसायला जागा नाही, आहे त्या जागेचीही मोठी दुरवस्था झाल्याचे सांगितले.
(या चर्चेत संघाचे अध्यक्ष गंभीर रामोळे, डॉ. कृष्णाजी आपटे, सूर्यकांत धटिंगण, चंद्रशेखर खैरनार, राजेंद्र जोगदंड, नाना चव्हाण, रंगनाथ चव्हाण, पंडितराव बोढारे, शिवाजी बोढारे आदींनी सहभाग घेतला होता.)निवडणूक आली की उमेदवारांचे आश्वासने ऐकून घेण्यासारखे असतात, मात्र त्यावर अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. निवडून येण्याची आधी लोकप्रतिनिधी घरोघरी फिरून जो दिसेल त्याला नमस्कार करतात, तर एकादा ज्येष्ठ दिसला की त्याच्या पाया पडायचे नाटकही करतात व गोड गोड बोलत कधीही आवाज द्या तुमच्यासाठी मध्यरात्रीही येईल, असे सांगतात. मात्र प्रत्यक्षात गरज पडल्यावर हेच लोकप्रतिनिधी सापडत नाही, असे विविध चर्चेत ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखविले.