चिडचिड होत असेल तर सत्ता सोडा
By admin | Published: October 5, 2016 11:10 PM2016-10-05T23:10:00+5:302016-10-05T23:12:45+5:30
सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
नाशिक : विविध जाती-धर्मांचे मोर्चे, कांद्याचा भाव, कुपोषण व आरोग्य असे प्रश्न राज्यापुढे आ वासून उभे आहेत. ते सोडवता येत नसल्याने मुख्यमंत्री चिडचिड करू लागले असून, विरोधी पक्षात असल्यासारखे वागू लागले आहेत. त्यामुळे चिडचिड करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी सत्ता सोडावी, असा सल्ला देत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोपर्डी अत्याचार प्रकरणी दोषींवर मुदतीत दोषारोपपत्र सादर न केल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून मुख्यमंत्र्यांना घेराव घालेल, असा खणखणीत इशाराही दिला आहे.
कांदा परिषदेच्या निमित्ताने सुप्रिया सुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता नाशकातील राष्ट्रवादी भवन येथे पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठकही घेण्यात आली, त्यात त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ होत्या. सुळे म्हणाल्या, कोपर्डी येथील मुलीवर अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून दोषींना कठोर शिक्षा देण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु त्यांना त्याचा विसर पडला आहे. येत्या ११ आॅक्टोबर रोजी या घटनेला तीन महिने पूर्ण होऊन आरोपींना जामीन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अजुनही दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेले नाही. त्यात नेमक्या काय अडचणी आहेत व काय गौडबंगाल आहे हे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेसमोर जाहीर करावे.
राज्य सरकार असंवेदनशील असल्यामुळे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत, सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरत असल्याने सर्व जाती-धर्मांचे मोर्चेही निघू लागले आहेत यास सरकारच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप करतांनाच कोणतेच प्रश्न सुटत नसल्याने मुख्यमंत्री चिडचिड करू लागले आहेत. चिडचिड करण्यापेक्षा त्यांनी सत्ता सोडावी, सरकार चालविण्याची क्षमता आमच्या नेत्यांमध्ये आहे असा सल्लाही सुळे यांनी दिला. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणूकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसला फक्त जनतेच्या भल्यासाठी सत्ता हवी आहे, त्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ...तर मुख्यमंत्र्यांना घेरावफौजदारी गुन्ह्यात तीन महिन्यात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल न झाल्यास जामीन मिळणे शक्य होते. त्यामुळे मुदतीत दोषारोपपत्र दाखल न केल्यास राष्ट्रवादी युवती, महिला आघाडीसह संपूर्ण पक्ष कार्यकर्ते रस्त्यावर उतरून मुख्यमंत्र्यांना असतील तेथे घेराव घालतील, असा इशाराही सुळे यांनी दिला.