असेल वशिला गाठीला, तरच जावे लसीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:15 AM2021-05-27T04:15:29+5:302021-05-27T04:15:29+5:30
दिवसभर उन्हातान्हात उभे राहून लस मिळत नसल्याने अनेकांना चकरा माराव्या लागत आहेत. मात्र, दुसरीकडे काही गावपुढारी दवाखान्यातच ठाण ...
दिवसभर उन्हातान्हात उभे राहून लस मिळत नसल्याने अनेकांना चकरा माराव्या लागत आहेत. मात्र, दुसरीकडे काही गावपुढारी दवाखान्यातच ठाण मांडून बसत असून, बाहेरगावाहून आलेल्या त्यांच्या नातेवाईक व समर्थकांना लस दिली जात आहे. ज्याची काठी त्याची म्हैस या म्हणीप्रमाणे स्थानिकांना डावलून शहरातून मोठ-मोठ्या चारचाकी वाहनातून लसीकरणासाठी त्यांचे नातेवाईक येत आहेत. त्यांना थेट आत प्रवेश दिला जात असून, लगेच लसीकरण करून घेतले जात आहे. एकीकडे ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिल्या व दुसऱ्या लसीच्या डोससाठी चकरा माराव्या लागत असताना, बाहेरगावाहून आलेल्या वशिल्याच्या सर्व वयोगटातील नातेवाईकांना सरसकट लस दिली जात आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
इन्फो
प्राधान्यक्रम देण्याची मागणी
सर्वसामान्य नागरिक उन्हात ताटकळत उभे राहतात. या ठिकाणी बसण्याची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, बाहेर स्वच्छतागृहांची सोय नाही. लसीकरणासाठी टोकणची पद्धत नाही. केंद्रावर किती लसींचा डोस उपलब्ध आहे हे फलकावर लिहिले जात नाही. पहाटेपासून लोक रांगेत उभे असले तरी लसीकरण केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी ११ वाजेनंतरच लसीकरणास सुरुवात करतात. लसींचे डोस संपल्यावर रांगेत उभे असलेल्या नागरिकांच्या नोंदी घेऊन किमान त्यांना दुसऱ्या दिवशी तरी प्राधान्य दिले जावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.