आदित्यसाठी जागा सोडल्यास भुसेंचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 06:07 AM2019-09-15T06:07:54+5:302019-09-15T06:08:12+5:30
शिवसेनेने केलेल्या एका पाहणीत निघाल्याने या मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार व सध्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेल्या दादा भुसे यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- धनंजय वाखारे
नाशिक : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यास जिल्ह्यातील मालेगाव बाह्य हा मतदारसंघ सुरक्षित असल्याचा निष्कर्ष शिवसेनेने केलेल्या एका पाहणीत निघाल्याने या मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार व सध्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेल्या दादा भुसे यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांच्या समर्थकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
मालेगाव येथे झालेल्या जनआशीर्वाद यात्रेत राज्यमंत्री दादा भुसे यांनी आदित्य यांना आपल्या मतदारसंघातून लढण्याचा आग्रह धरला होता तर त्यापूर्वी जळगाव येथे झालेल्या सभेत जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा पर्याय पुढे केला होता. आदित्य यांनी शहरी मतदारसंघापेक्षा ग्रामीण भागातून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला जाऊ लागल्याने त्यादृष्टीने शिवसेनेने सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी करण्यात आली. त्यात मालेगाव बाह्य यासह जळगाव ग्रामीण, कोल्हापूर, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस हे मतदारसंघ सर्वाधिक सुरक्षित असल्याचे समोर आल्याचे समजते. आदित्य यांनी मालेगाव बाह्यला पसंती दिल्यास भुसे यांना लगतच्या नांदगावमधून उमेदवारी करावी लागेल अथवा त्यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन केले जाऊ शकते, अशा चर्चांना उधाण आले आहे.
हा कसला सुरक्षित मतदारसंघ?
मालेगाव बाह्य हा सुरक्षित मतदारसंघ मानला गेला असला तरी २००४ पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेस-राष्टÑवादीच्या ताब्यात होता. २००९ मध्ये भुसे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी करत ५२.७५ टक्के मते घेतली. २०१४ मध्ये त्यांना ४५.०८ टक्के मते मिळाली. मतांच्या टक्केवारीत घट होऊनही हा मतदार संघ सुरक्षित कसा, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.