कोकाटेंना शिक्षा दिली, तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल अन् पैसा खर्च होईल -नाशिक सत्र न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 17:10 IST2025-03-15T17:07:56+5:302025-03-15T17:10:14+5:30
Manikrao Kokate Nashik Court: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

कोकाटेंना शिक्षा दिली, तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल अन् पैसा खर्च होईल -नाशिक सत्र न्यायालय
Manikrao Kokate Nashik District Court News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थगितीचा निकाल देताना नाशिकन्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले आहे, त्यावरून आता वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे. कोकाटेंना शिक्षा दिली, तर त्यांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल आणि जनतेचा पैसा खर्च होईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका मिळवताना गैरमार्गाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोषी ठरवण्यात आले असून, न्यायालयाने शिक्षाही ठोठावली आहे. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी होत असताना कोकाटेंनी नाशिक न्यायालयात आव्हान दिले.
शिक्षेला स्थगिती देताना न्यायालयाच्या निरीक्षणावर आश्चर्य
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या निर्णयाला स्थगिती दिली. पण, हा निर्णय देताना जे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यावर टीका होत आहे.
"माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही, तर ते अपात्र ठरू शकतात. त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली, तर जनतेच्या पैशाचा खर्च होईल", असे निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयाने नोंदवले.
वडेट्टीवारांनी उपस्थित केला प्रश्न
कोर्टाने स्थगिती देताना जे निरीक्षण नोंदवले आहे, त्यावर बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, "कोणताही गुन्हेगार असेल आणि तो शिक्षेस पात्र असेल, तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. निवडणुकीचा खर्च वाढेल म्हणून आम्ही त्यांना माफ करतो ही कोर्टाची भूमिका हास्यास्पद आहे. न्यायालय असे वागणार असेल, तर न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची? उद्या एखाद्याने खून केला तर न्यायालय त्याला शिक्षा ठोठावताना असाच तर्क मांडणार का?", असे वडेट्टीवार म्हणाले.