पैसे उपलब्ध न झाल्यास गुन्हे दाखल करणार
By admin | Published: December 27, 2016 01:26 AM2016-12-27T01:26:59+5:302016-12-27T01:27:12+5:30
राधाकृष्ण विखे : श्वेतपत्रिकेची मागणी
नाशिक : नोटाबंदीच्या निर्णयानंतर तब्बल ५७ वेळा शुद्धीपत्रक काढावे लागणे हे सरकारच्या चुकीच्या निर्णयाचेच द्योतक आहे़ पंतप्रधानांच्या आश्वासनानुसार येत्या ३० डिसेंबरनंतर जनतेला नोटा उपलब्ध करून न दिल्यास सरकारवर गुन्हे दाखल करावेत़ याबरोबरच या पन्नास दिवसांतील वास्तव परिस्थितीबाबत सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची मागणी विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केली़ जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीसंदर्भात सोमवारी (दि़२६) पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ विखे यांनी सांगितले की, गुजरातच्या नवसारीतील नवीन नोटांची उधळण, भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमधून जप्त केलेले काळे पैसे यामुळे त्यांना नोटाबंदीची पुरेपूर कल्पना असल्याचे सिद्ध होते़ अच्छे दिन, काळे धन, जनधन खात्यामध्ये पंधरा लाख जमा होणार, कॅशलेस इंडिया अशी विविध प्रलोभने देऊन सरकारने जनतेला अक्षरश: मूर्खात काढले आहे़ केवळ एक टक्का लोकांकडे असलेल्या काळ्या धनासाठी ९९ टक्के देशवासीयांना वेठीस धरले आहे़ जितका पैसा चलनातून रद्द झाला तितकाच पुन्हा बँकांमध्ये जमा झाल्याने काळा पैसा कोठे आहे़
‘कॅशलेस इंडिया’ बनवायचाय तर मग नोटांची छपाई कशासाठी सुरू आहे़ मुळात देशभरातील साडेसहा लाख खेड्यांपैकी साडेचार लाख खेड्यांमध्ये बँकाच नाहीत तर एटीएम कुठून असणाऱ बहुतांशी खेड्यांमध्ये आठ तासांपेक्षा अधिक काळ वीज नसते तेव्हा कनेक्टिव्हिटी कशी मिळणार, त्यामुळे कॅशलेसबाबत शंकाच आहे़ भाजपा सरकार हे शेतकरी, कामगार, शेतमजुरांविरोधातील सरकार आहे़ नोटांबदीच्या निर्णयानंतर शेतमालाचे भाव ६० टक्क्यांनी कोसळल्याचा अहवाल आहे, त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यास मारणी घातले असून, ताबडतोब कर्जमाफीची घोषणा करावी़. देशातील सर्वसामान्य जनता ही सोशिक असून, येत्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपाला मोठी किंमत चुकवावी लागेल़ पंतप्रधानांच्या आश्वासनानुसार पन्नास दिवस थांबू, मात्र त्यानंतरही परिस्थिती न सुधारल्यास आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी जानेवारीमध्ये कॉँग्रेसची बैठक होणार असल्याचे विखे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़ (प्रतिनिधी)
भाजपा म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट
अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा पाहता भाजपा सरकार इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असल्याचे समोर आले आहे़ महापुरुषांच्या स्मारकाच्या माध्यमातून सरकार राजकारण करीत असून, किमान त्यांना तरी यापासून दूर ठेवा व जनतेची दिशाभूल करण्याचे काम थांबवा, असे पाटील यांनी सांगितले़
खिल्ली उडवू नका उत्तरे द्या
देशात व राज्यात परिस्थिती सारखीच असून काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत खिल्ली उडविण्याऐवजी उत्तर द्या़ सरकारने रिझर्व्ह बँकेच्या अधिकारावर अतिक्रमण केले असून, नोटाबंदी करून भारतीय जनतेवर एकप्रकारे सूड उगविल्याचे विखे म्हणाले़