उद्या ‘मुहर्रम’चे चंद्रदर्शन घडल्यास नववर्ष हिजरी सन १४४०ला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 04:55 PM2018-09-09T16:55:24+5:302018-09-09T17:28:41+5:30
इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४०ला सोमवारी (दि.९) संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रदर्शन घडल्यास मुस्लीम बांधवांच्या नववर्षाचा पहिला महिना ‘मुहर्रमुल हराम’ला सुरूवात होईल.
नाशिक : इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४०ला सोमवारी (दि.९) संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रदर्शन घडल्यास मुस्लीम बांधवांच्या नववर्षाचा पहिला महिना ‘मुहर्रमुल हराम’ला सुरूवात होईल. मुहर्रमनिमित्तमुस्लीमबहूल परिसरात विविध धार्मिक संघटनांच्या वतीने दहा दिवसीय प्रवचनमालांचे आयोजन करण्यात आले आहे.
इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचे नातू शहीद-ए-आजम हजरत इमाम-ए-हुसेन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी मुस्लीम बांधव मुहर्रमच्या सुरूवातीच्या दहा दिवसांमध्ये ‘करबला’च्या स्मृतींना उजाळा देतात. इस्लामी कालगणना चंद्रदर्शनावर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक महिन्याच्या २९ तारखेला चंद्रदर्शन घेऊन महिना बदलला जातो. चंद्रदर्शन न घडल्यास चालू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करुन पुढचा महिना सुरू होतो. मुहर्रमला धार्मिकदृष्टया अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. मुहर्रमच्या दहाव्या दिवशी मुस्लीम बांधवांकडून आशुराचे नमाजपठण व प्रार्थना केली जाते. या महिन्याचा दहावा दिवस ‘आशुरा’म्हणून पाळला जातो. या दिवशी समाजबांधवांकडून ठिकठिकाणी सामुहिकरित्या सरबतचे वाटप केले जाते.
यावर्षी मुहर्रम आाणि गणेशोत्सव हे दोन्ही सण एकाच कालावधीत साजरे होत असल्याचा दुर्मीळ योग जुळून आला आहे. एकात्मता सामाजिक बांधिलकी व जातीय सलोखा कायम जोपासावा असाच संदेश दोन्ही समाजांसाठी हा योग देऊन जाणारा आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवदेखील बारा दिवस साजरा होतो आणि मुहर्रमचे सुरूवातीचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि या कालावधीत करबलाच्या स्मृती जागविल्या जातात. धर्मगुरूंकडून प्रवचनातून त्याबाबत प्रकाश टाकला जातो.
‘इमामशाही’मध्ये सोहळा
सारडासर्कल येथील हजरत सय्यद इमामशहा बाबा यांच्या दर्ग्याच्या आवारात मुहर्रमच्या कालावधीत दहा दिवस मोठी लगबग पहावयास मिळते. येथील मानाचा अळीवपासून (हालौ) तयार केला जाणारा ताबूत प्रसिध्द आहे. हा ताबूत तयार करण्यासाठी सय्यद कुटुंबियांकडून प्रारंभ क रण्यात आला आहे. बांबुचा वापर करत त्यावर कापूस लावून तो पाण्याने भिजवीला जातो आणि त्यामध्ये अळीवच्या बिया पेरल्या जातात. मुहर्रमच्या नवव्या दिवसापर्यंत या ताबूताला पुर्णत: हिरवळीचा साज चढलेला पहावयास मिळतो. शेवटचे दोन दिवस या ठिकाणी यात्रोत्सव साजरा केला जातो. या यात्रोत्सवाला हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा लाभली आहे.